'तो' शेवटचा नाश्ता आणि दादांचा प्रेमळ स्वभाव; राजेश टोपेंनी सांगितला 'माणूस' अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:05 IST2026-01-28T15:56:52+5:302026-01-28T16:05:18+5:30
Ajit Pawar Death: 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करा'; इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी मला मिठी मारली; राजेश टोपे भावूक

'तो' शेवटचा नाश्ता आणि दादांचा प्रेमळ स्वभाव; राजेश टोपेंनी सांगितला 'माणूस' अजित पवार
अंबड (जालना): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून, त्यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "अजितदादा केवळ नेते नव्हते, तर ते माझ्यासाठी वडीलबंधूंसारखे होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक रचनात्मक कार्याचा ध्यास घेतलेला लोकनेता गमावला आहे," अशा शब्दांत टोपेंनी आपली शोकसंवेदना मांडली.
शेवटची भेट आणि 'गोविंद बागे'तील तो नाश्ता
राजेश टोपे यांनी दादांसोबतच्या शेवटच्या भेटीची हृदयद्रावक आठवण सांगितली. "काही दिवसांपूर्वीच बारामतीच्या गोविंद बागेत कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आमची भेट झाली होती. आम्ही एकत्र नाश्ता केला, खूप गप्पा मारल्या. आम्ही ज्येष्ठ नेत्यांनी दादांना आणि आदरणीय पवार साहेबांना विनंती केली होती की, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित कराव्यात. त्यानंतर दादांनी मला स्वतःच्या गाडीत बसवलं, स्वतः गाडी चालवत संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरवून दाखवलं. आम्ही एकत्र जेवलो... ती भेट, ते प्रेमळ आदरातिथ्य आता कायमची आठवण बनून उरलं आहे," असे टोपे म्हणाले.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
कोरोना काळातील 'दादा' आधार
राजेश टोपे यांनी आरोग्य मंत्री म्हणून काम करतानाचा अनुभव सांगताना सांगितले की, कोरोनाच्या भीषण संकटात दादांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेता आले. दादांची शिस्त, सकाळी ७ वाजल्यापासून कामाला लागण्याची वृत्ती आणि प्रशासनावरील पकड हे राजकारणातील तरुणांसाठी आदर्श होते.
दुःख पचवणे कठीण
"महाराष्ट्राने एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता गमावला आहे. पवार कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे हे वैयक्तिक दुःख पचवणे कठीण आहे," असे म्हणत राजेश टोपे यांनी अजितदादांना आदरांजली वाहिली.