पावणेदोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:16 IST2025-03-03T19:16:17+5:302025-03-03T19:16:31+5:30
पोलिसासह त्रयस्थ व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

पावणेदोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
परतूर (जि. जालना) : ताब्यात असलेले टिप्पर सोडण्यासाठी, तसेच तक्रारदाराच्या भावाला जामीन मिळविण्यास मदत करण्यासाठी १ लाख ८० रुपयांची लाच त्रयस्थ व्यक्तीमार्फत स्वीकारल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाडसह पोलिस शिपाई व एका त्रयस्थ व्यक्तीविरुद्ध आष्टी ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. इंगेवाड (मूळ रा. वाघाळ ता. जि. नांदेड ह.मु. आष्टी), पोलिस शिपाई गोकुळदास माणिक देवळे (ह.मु. जायकवाडी आष्टी) आणि त्रयस्थ व्यक्ती विष्णू बाळासाहेब कुरदने (रा. पांडेपोखरी ता. परतूर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. इंगेवाड व देवळे यांनी कुर्दने याच्यामार्फत तक्रारदारास दोन लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदारांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.
कुरदणे याने २ लाख लाचेची मागणी करून तडजोडअंती १ लाख ८० हजार रुपये स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले. कुरदणे याने १ मार्च रोजी तक्रारदारांकडून १ लाख ८० रुपये आष्टीमधील सई लस्सी सेंटर (लहुजी चौक) येथे पंचासमक्ष स्वतः स्वीकारली असता त्याला पथकाने रंगेहाथ पकडले. कुरदने याच्या अंगझडतीत सापडलेली २२ हजार १७० रुपये रक्कम, एक मोबाइल, मोटारसायकलची चावी जप्त केली आहे. दरम्यान, आरोपींच्या घराची झडती सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उपाधीक्षक शंकर शिंदे, निरीक्षक शेख युनूस, अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, सहायक निरीक्षक सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, अंबादास पुरी यांनी केली.
आरोपी फरार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावल्याची कुणकुण लागताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड व पोलिस शिपाई देवळे हे दोघे पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.