धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 22:50 IST2025-09-30T22:49:19+5:302025-09-30T22:50:11+5:30
या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
अंबड: धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या गोविंद जाधव (लोणार भायगाव, ता. अंबड) यांनी मंगळवारी बदनापूर-पैठण महामार्गावर स्वतःची चारचाकी गाडी जाळून सरकारचा तीव्र निषेध केला. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गोविंद जाधव हे धनगर आरक्षण आंदोलन चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सोमवारी, त्यांनी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे ‘धनगर आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, कायदेशीर कचाट्यात हे घोंगडे भिजत ठेवू नये आणि एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र तातडीने द्यावे, अशी मागणी केली होती.
आंदोलनाच्या पूर्वसंध्येला संताप
बुधवारी धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी समाजबांधवांकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला ही चारचाकी जाळल्याची घटना घडल्यामुळे, धनगर समाजातून सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.