भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:54 IST2026-01-14T06:54:58+5:302026-01-14T06:54:58+5:30
अमेरिकेसोबत व्यापार करताना आर्थिक फटका बसणार; चीन, यूएईचीही केली कोंडी, चीन म्हणाला, याचे गंभीर परिणाम होतील

भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला आता अमेरिकेसोबत व्यापार करताना २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) द्यावे लागेल, अशी मोठी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांना बसण्याची शक्यता आहे.
जे देश इराणच्या सत्ताधाऱ्यांना आर्थिक बळ देतील, त्यांना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारत, चीन, तुर्कीये, यूएई, पाकिस्तान आणि आर्मेनिया यांचा समावेश आहे. दरम्यान, २५ टक्के टॅरिफ आकारण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर चीनने जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा कठोर इशारा दिला आहे.
भारताची मोठी कोंडी का झाली आहे?
भारतासाठी ही घोषणा चिंतेचा विषय आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले आहेत, जे जगातील उच्चांकी टैरिफपैकी एक आहे. यामध्ये रशियाकडून खरेदी केलेल्या तेलावरील २५ टक्के टॅरिफचाही समावेश आहे. आता इराणच्या व्यापारामुळे अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागेल.
भारताला फटका नाही : फियो
टॅरिफमुळे भारताच्या व्यापार क्षेत्रावर याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास निर्यातदारांची शिखर संस्था 'फियो'नेव्यक्त केला आहे. भारतीय कंपन्या अमेरिकेच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करत असून, अन्न आणि औषधांचाच व्यापार केला जात असल्याचे फियोने स्पष्ट केले.
काय निर्यात होते, काय आयात होते ?
भारताकडून निर्यात - तांदूळ, सोयाबीन, केळी, चहा, साखर, औषधे, मसाले, मशिनरी, कृत्रिम दागिने
इराणकडून आयात- सुका मेवा, सेंद्रिय/असेंद्रिय रसायने, काचेच्या वस्तू, पेट्रोलियम उत्पादने