हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 02:02 IST2025-11-28T02:01:58+5:302025-11-28T02:02:38+5:30
ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते.

हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...!
हाँगकाँगमध्ये २६ नोव्हेंबर रोजी एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीवर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. या बहुमजली निवासी इमारतीमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बचाव पथक गुरुवारी (२८ नोव्हेंबर २०२५) दुसऱ्या दिवशीही प्रयत्न करत होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून ८३ वर पोहोचला आहे. तर २८० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. गेल्या ७० वर्षांतील ही शहरातील सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत सुमारे ७६ लोक जखमी झाले आहेत, यांपैकी ४३ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. सातपैकी चार ब्लॉकमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमनदलाला यश आले असून, उर्वरित ३१ मजली इमारतींच्या वरच्या मजल्यांवर संध्याकाळपर्यंत आग धगधगत होती. बचाव कार्य अद्यापही सुरू असून इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही -
महत्वाचे म्हणजे, या इमारतींना आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. याप्रकरणी गुन्हेगारी तपास सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सात इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, प्रत्येक इमारत ३२ मजली होती. हाँगकाँग सरकारने पीडितांसाठी ३० कोटी हाँगकाँग डॉलर (सुमारे ४.३ कोटी अमेरिकन डॉलर) च्या मदतीची घोषणा केली आहे.
ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, हाँगकाँग पोलिसांनी या अग्निकांडप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी जबाबदार असलेल्या बांधकाम कंपनीचे ते अधिकारी आहेत. नूतनीकरणाच्या कामात वापरलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. याशिवाय, पोलीस अधीक्षक एलीन चुंग यांनी म्हटले आहे की, "कंपनीच्या जबाबदार पक्षांचा घोर निष्काळजीपणा या दुर्घटनेला आणि मोठ्या जीवितहानीला कारणीभूत आहे."