अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:50 IST2025-10-25T13:50:18+5:302025-10-25T13:50:49+5:30
भारतापाठोपाठ आता अफगाणिस्ताननेही पाकिस्तानचे पाणी अडवण्याचे मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे पाकिस्तानवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावात आता आणखी एका नव्या ट्विस्टची भर पडली आहे. तालिबान सरकारने कुनार नदीवर धरण बांधण्याची योजना जाहीर केली आहे. कुनार नदी ही काबुल नदीची एक महत्त्वाची उपनदी असून, ती पाकिस्तानमधून वाहते. भारतापाठोपाठ आता अफगाणिस्ताननेही पाकिस्तानचे पाणी अडवण्याचे मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे पाकिस्तानवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
या नद्या पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या!
अफगाणिस्तानातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नद्यांमध्ये प्रामुख्याने काबुल नदी आणि तिची उपनदी कुनार नदी यांचा समावेश आहे. काबुल नदी ही पूर्वेकडील अफगाणिस्तानमधून वायव्य पाकिस्तानमध्ये वाहणारी सर्वात महत्त्वाची नदी आहे. काबुल शहरातून वाहत ती खैबर खिंडीतून पाकिस्तानात प्रवेश करते आणि शेवटी सिंधू नदीला मिळते. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतासाठी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी ही नदी जीवनवाहिनी आहे.
तर, कुनार नदी ही हिंदू कुश पर्वतातून उगम पावते आणि अफगाणिस्तानातून जलालाबादजवळ पाकिस्तानात प्रवेश करते. सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय, गोमल नदी देखील सिंधू नदी प्रणालीमध्ये सामील होण्यापूर्वी पाकिस्तानात वाहते.
तालिबानने पाणी अडवल्यास काय होईल?
जर तालिबानने या नद्यांचे पाणी पाकिस्तानात जाण्यापासून पूर्णपणे रोखले, तर त्याचे पाकिस्तानवर अत्यंत विनाशकारी परिणाम होऊ शकतात.
कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम: पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसेल. पंजाब आणि खैबर पख्तूनख्वासारखे प्रांत, जे काबुल आणि कुनार नद्यांवर सिंचनासाठी अवलंबून आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणावर पीक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
पिण्याच्या पाण्याची टंचाई: अनेक शहरे आणि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या समुदायांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
वीज निर्मितीवर परिणाम: पाकिस्तान वीज निर्मितीसाठी काबुल आणि कुनार नद्यांवर असलेल्या जलविद्युत प्रकल्पांवर अवलंबून आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास जलविद्युत निर्मिती लक्षणीयरीत्या घटेल, ज्यामुळे देशात ब्लॅकआउटची समस्या उभी राहू शकते.
राजकीय तणाव वाढणार!
तालिबानच्या या एकतर्फी निर्णयामुळे सीमावर्ती भागात तणाव वाढू शकतो. या कृतीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडू शकतात. पाणी अडवल्यास दोन्ही देशांमध्ये नदीच्या पाण्यावरून तीव्र संघर्ष होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारताने यापूर्वीच पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे, आणि आता अफगाणिस्ताननेही अशीच खेळी खेळल्यामुळे, आत पाकिस्तानची चिंता वाढली आहे.