"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:27 IST2025-10-13T18:25:04+5:302025-10-13T18:27:56+5:30
Donald Trump Israel Hamas Ceasefire: गाझा शांती कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आभार मानले.

"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
Benjamin Netanyahu Donald Trump Nobel Peace Prize: जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या आणखी माणसांची गरज आहे, असे म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्तुतीसुमने उधळली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने गाझा शांती करार योजना बनवली असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलयाच्या दौऱ्यावर आहेत. इस्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे जोरदार स्वागत झाले.
इस्रायलयची संसदे कॅनसेटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी इस्रायलच्या खासदारांनी उभे राहून आणि टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. ट्रम्प बोलण्यापूर्वी पंतप्रधान नेतन्याहू यांचे भाषण झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे कुणीच नाही
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, "जगाला आणखी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या माणसांची गरज आहे. ट्रम्प यांनी इस्रायलसाठी केले, तितके कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी केलेले नाही. कोणताही राष्ट्राध्यक्ष इथपर्यंत पोहोचू शकले नाही."
संसदेत बोलताना नेतन्याहू म्हणाले, "आम्ही ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि चिरंतन ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव करू."
"ट्रम्प यांना नोबेल मिळावे म्हणून आम्ही..."
बेंजामिन नेतन्याहू यांच्यापूर्वी बोलताना इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. "डोनाल्ड ट्रम्प यांच्याइतका नोबेल शांती पुरस्काराचा दावेदार कुणीच नाहीये. पुढच्या वर्षी इस्रायल त्यांची शिफारस करेल आणि त्यांना नोबेल मिळावा म्हणून जगभरातून समर्थन मिळवू", असे ते म्हणाले.
"हजारो वर्षांनंतरही यहुदी लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आमचा देश नेहमी चांगल्या लोकांना लक्षात ठेवतो. या ग्रहावर एकही असा व्यक्ती नाहीये ज्याने शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपल्या इतके प्रयत्न केले असतील", अशा शब्दात ओहाना यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले.