VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 09:30 IST2025-09-23T09:26:27+5:302025-09-23T09:30:16+5:30

अफगाणिस्तानच्या एका १३ वर्षांच्या मुलाने जीवावर उदार होऊन एक अत्यंत धोकादायक प्रवास केला आहे.

VIRAL: A terrifying 'journey'! A 13-year-old boy reaches India from Afghanistan by hiding under the wheels of a plane | VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा

AI Generated Image

मृत्यूच्या दाढेतून परत आल्यासारखंच काहीसं घडलं आहे. अफगाणिस्तानच्या एका १३ वर्षांच्या मुलाने जीवावर उदार होऊन एक अत्यंत धोकादायक प्रवास केला आहे. हा मुलगा काबुलहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानामध्ये थेट विमानांच्या चाकांमध्ये अर्थात व्हील वेलमध्ये लपून बसला आणि तब्बल ९४ मिनिटांच्या या थरारक प्रवासानंतर तो दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप पोहोचला. ही घटना रविवारी अफगाणिस्तानची एअरलाइन 'केएएम एअर'च्या 'आरक्यु४४०१' या विमानामध्ये घडली.

विमानतळावर उतरताच सत्य उघड!

एअरबस ए ३४० हे विमान सकाळी ८.४६ वाजता काबुलहून निघाले आणि सकाळी १०.२० वाजता दिल्लीत पोहोचले. सर्व प्रवासी उतरल्यानंतर विमान जेव्हा टॅक्सीवेवर उभे होते, त्याचवेळी विमानाजवळ फिरणारा एक मुलगा तेथे काम करणाऱ्या एका ग्राउंड स्टाफच्या नजरेस पडला. त्याने तात्काळ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. सीआयएसएफच्या जवानांनी या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

ईराणला जायचं होतं, पण पोहोचला भारतात!

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, हा मुलगा अफगाणिस्तानचा आहे. त्याला खरं तर इराणला जायचं होतं, पण तो चुकून भारताकडे येणाऱ्या विमानाच्या चाकात लपला. त्याने पोलिसांना सांगितले की, तो प्रवाशांच्या गाडीच्या मागून विमानतळाच्या आतमध्ये घुसला आणि त्यानंतर विमानांच्या चाकांच्या जागेत लपून बसला.

व्हील वेल का असते धोकादायक?

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे विमानांच्या चाकांमध्ये बसून प्रवास करणे अत्यंत धोकादायक असते. कारण, १० हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते. यामुळे काही मिनिटांतच व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते किंवा तिचा मृत्यूही होऊ शकतो. ३० हजार फूट उंचीवर तापमान -४० ते -६० अंश सेल्सियसपर्यंत खाली येते. या परिस्थितीत केवळ एक ते पाच टक्के लोकच जिवंत राहतात. बाकीच्यांचा मृत्यू ऑक्सिजनची कमतरता, शरीराचे तापमान घटणे किंवा लँडिंगच्या वेळी खाली पडून होतो.

असा वाचला जीव!

एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, टेक-ऑफ करताना चाकं विमानामध्ये ओढली जातात आणि त्यानंतर दरवाजा बंद होतो. हा मुलगा याच बंद जागेत लपून राहिला असावा. इथे हवा आणि तापमान जवळपास सामान्य राहिल्याने तो जिवंत राहू शकला.

Web Title: VIRAL: A terrifying 'journey'! A 13-year-old boy reaches India from Afghanistan by hiding under the wheels of a plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.