६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:12 IST2026-01-15T11:11:52+5:302026-01-15T11:12:25+5:30
हे जहाज एकटे प्रवास करत नाही. याच्यासोबत क्षेपणास्त्र विरोधी विनाशिका आणि पाणबुड्यांचा ताफा असतो, ज्याला 'कॅरियर स्ट्राईक ग्रुप' म्हटले जाते.

६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
वॉशिंग्टन : जागतिक राजकारणात आणि युद्धाच्या मैदानात अमेरिकेचे वर्चस्व टिकवून ठेवण्यात त्यांच्या 'एअरक्राफ्ट कॅरियर'चा मोठा वाटा असतो. सध्या चर्चेत असलेले अमेरिकेचे USS अब्राहम लिंकन (CVN-72) हे केवळ एक जहाज नसून समुद्रावर तरंगणारे एक अभेद्य शहर आहे. अणुकेंद्रित ऊर्जेवर चालणाऱ्या या महाकाय युद्धनौकेच्या ताकदीने शत्रूचे धाबे दणाणले आहेत. ही युद्धनौका ६५-७० लढाऊ विमाने घेऊन इराणच्या दिशेने निघाल्याने खळबळ उडाली आहे.
हे जहाज निमिट्झ क्लासमधील 'सुपर कॅरियर' आहे. यावर एकाच वेळी ९० पेक्षा जास्त लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात केली जाऊ शकतात. यात प्रामुख्याने अत्याधुनिक F-35C लाइटनिंग II सारख्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा समावेश असतो. हे जहाज दोन न्यूक्लियर रिॲक्टर्सवर चालते. यामुळे याला इंधन भरण्यासाठी वारंवार बंदरात येण्याची गरज पडत नाही. हे जहाज सलग २० ते २५ वर्षे समुद्रात कार्यरत राहू शकते. हे जहाज एकटे प्रवास करत नाही. याच्यासोबत क्षेपणास्त्र विरोधी विनाशिका आणि पाणबुड्यांचा ताफा असतो, ज्याला 'कॅरियर स्ट्राईक ग्रुप' म्हटले जाते. हे संपूर्ण युनिट कोणत्याही देशाच्या नौदलाला टक्कर देण्यास सक्षम आहे.
महत्वाचे म्हणजे या जहाजावर ७००० पेक्षा जास्त नौसैनिक आणि कर्मचारी राहू शकतात. त्यांच्यासाठी तिथे खाण्यापिण्याची सोय, हॉस्पिटल आणि मनोरंजनाची सर्व साधने उपलब्ध असतात. मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल तणाव असो किंवा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली, अमेरिका नेहमीच 'USS अब्राहम लिंकन'ला संरक्षणासाठी तैनात करते. हे जहाज जिथे तैनात असते, तिथे अमेरिकेची लष्करी शक्ती आणि दबदबा स्पष्टपणे दिसून येतो.
या युद्धनौकेचा ताफा इस्रायलच्या सुरक्षेसाठी आणि इराणच्याविरोधात इराणच्या दिशेने वळविण्यात आला आहे. अमेरिका इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धाची शक्यता नसली तरी अमेरिका हल्ला करेल म्हणून भारतासह इतर देशांनी आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत.