डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:40 IST2025-11-20T14:39:23+5:302025-11-20T14:40:45+5:30
US Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याचा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
US Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. पण, यावेळी त्यांनी आणखी एक नवीन दावा केला आहे. ते म्हणतात की, त्यांनी दोन्ही देशांना 350 टक्के शुल्क आणि पूर्ण व्यापारबंदीची धमकी दिली होती, ज्यामुळे दोन्ही देश घाबरले आणि युद्ध थांबवण्यास तयार झाले. ट्रम्प यांच्या दाव्यावर अद्याप भारताने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यूएस-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये दावा
यूएस-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये (19 नोव्हेंबर 2025 रोजी ) बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर आण्विक शस्त्रांनी हल्ला करणार होते. मी दोन्ही देशांच्या प्रमुखांना फोन केला आणि सांगितले की, हल्ला केला, तर मी दोन्ही देशांवर 350% शुल्क लावीन आणि अमेरिका तुमच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही. या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी आम्हाला असे न करण्याची विनंती केली. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मला फरक पडत नाही. तुम्ही युद्ध थांबवा, तेव्हाच मी माझे शब्द मागे घेईन.
VIDEO | Washington DC: US President Donald Trump (@POTUS) claims again that he prevented India–Pakistan war by threatening both countries with a 350 per cent tariff.
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2025
Trump says, "India and Pakistan were going to go at it with nuclear weapons. I told them, you can go at it, but… pic.twitter.com/PQ7TtRHecr
लाखो लोकांचे प्राण वाचवले
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, युद्ध थांबवल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांना फोन करून त्यांचे आभार मानले आणि म्हटले की, त्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा हा दावा केला आहे. मात्र, भारताने यापूर्वीच स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात तिसऱ्या देशांचा सहभाग नव्हता. पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने हल्ले थांबवले.
आता त्यांनी युद्ध थांबवल्या दाव्यासोबतच, 350% शुल्काची धमकी देऊन आण्विक युद्ध रोखल्याचा नवीन दावा केल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आता या नवीन दाव्यावर भारताकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.