पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यात आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. सुरक्षा परिषदेत बंद खोलीत भारत-पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या स्थितीवर चर्चा व्हावी अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. बंद खोलीतील चर्चा सार्वजनिक केली जात नाही. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडला जाणार असल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
भारताकडून होणाऱ्या आक्रमक कारवाईला घाबरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज ही बैठक होत आहे. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे आणि जुलैमध्ये होणाऱ्या १५ देशांच्या संयुक्त राष्ट्र संस्थेचे तो अध्यक्षपद भूषावेल. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानी सदस्य असीम इफ्तिखार अहमद यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, हे सर्व जम्मू काश्मीरात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे. या हल्ल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून प्रादेशिक आणि जागतिक शांतता, सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यावर चर्चा करून विचार विनिमय केला जाईल असं त्यांनी म्हटलं.
पाकिस्ताननं मागितली रशियाला मदत
भारत-पाकिस्तान युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानी उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधला. भारतासोबत रशियाची भागीदारी असून पाकिस्तानशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे रशियाने मध्यस्थी करावी असं पाकिस्तानला वाटते. त्यावर आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत पण त्यासाठी इस्लामाबाद आणि नवी दिल्लीची इच्छा असावी असं सांगत भारताने चर्चेवर सहमती दाखवण्याची अट रशियाने पाकिस्तानसमोर ठेवली.
इराण मध्यस्थीसाठी पुढे आला...
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हे नवी दिल्ली भेटीपूर्वी सोमवारी इस्लामाबादच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर पाकिस्तानात जाणार आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अरघची यांची भेट आहे. उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अरघची पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी एक महत्त्वाची बैठक घेतील त्याशिवाय भारत-पाकिस्तान तणावावर लक्ष केंद्रीत करतील.