रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:49 IST2026-01-15T15:43:27+5:302026-01-15T15:49:25+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अत्यंत विश्वासू आणि माजी सल्लागार सर्गेई करागानोव यांनी दिलेल्या एका इशाऱ्यामुळे युरोपसह अमेरिकेतही खळबळ उडाली आहे.

रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून, ते संपूर्ण जगाला विळखा घालण्याच्या तयारीत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अत्यंत विश्वासू आणि माजी सल्लागार सर्गेई करागानोव यांनी दिलेल्या एका इशाऱ्यामुळे युरोपसह अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. "जर रशियाला पराभवाच्या दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटन आणि जर्मनीवर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो," असे खळबळजनक विधान करागानोव यांनी केले आहे.
ब्रिटन आणि जर्मनीच का आहेत निशाण्यावर?
प्रसिद्ध पत्रकार टकर कार्लसन यांना दिलेल्या मुलाखतीत करागानोव यांनी रशियाची रणनीती स्पष्ट केली. त्यांच्या मते, युक्रेनला लष्करी मदत पुरवण्यात आणि युद्धाची आग धुमसत ठेवण्यात ब्रिटन आणि जर्मनीची भूमिका सर्वात आक्रमक आहे. रशियाने या दोन्ही देशांना आधीच आपल्या 'शत्रू राष्ट्रांच्या' यादीत स्थान दिले आहे. ब्रिटन हा या संपूर्ण कटाचा किंगपिन असून, तो युरोपला रशियाविरुद्ध भडकावत असल्याचा आरोप मॉस्कोने केला आहे.
हेरगिरी आणि 'ऑईल वॉर'मुळे तणाव वाढला
रशियाच्या मते, ब्रिटन आणि जर्मनी केवळ युक्रेनला शस्त्रे पुरवत नाहीत, तर रशियाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून हेरगिरीही करत आहेत. त्यातच, अमेरिकेच्या मदतीने रशियाचे तेल वाहून नेणारे टँकर्स रोखण्यात ब्रिटनचा मोठा हात असल्याचा दावा पुतीन प्रशासनाने केला आहे. हा रशियाविरुद्धचा थेट आर्थिक युद्ध पुकारण्याचा प्रकार असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.
अण्वस्त्र हल्ल्याची धमकी: केवळ इशारा की वास्तव?
करागानोव यांनी स्पष्टपणे सांगितले की, रशियाच्या अस्तित्वावर जर संकट आले, तर रशिया पारंपारिक युद्धाच्या मर्यादा पाळणार नाही. युरोपमधील नेत्यांना असा भ्रम आहे की हे युद्ध त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार नाही, पण अण्वस्त्र हल्ला झाल्यास त्याचे सर्वाधिक परिणाम ब्रिटन आणि जर्मनीला भोगावे लागतील. रशियाने आतापर्यंत खूप संयम राखला आहे, पण आता हा संयम सुटत चालल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
युरोपियन नेतृत्वावर बोचरी टीका
युरोपमधील सध्याचे नेतृत्व वास्तवापासून दूर असून ते आगीशी खेळत असल्याची टीकाही रशियाकडून करण्यात आली आहे. युक्रेनमधील हस्तक्षेप थांबवला नाही, तर रशियाला कठोर पावले उचलण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे करागानोव यांनी ठासून सांगितले. या विधानामुळे नाटो देशांमध्ये चिंतेचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अणुयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.