ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला मोठा आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 15:49 IST2025-10-19T15:48:41+5:302025-10-19T15:49:46+5:30
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानवर भारताचा ‘टुरिझम बॉयकॉट’

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला मोठा आर्थिक फटका
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताविरोधातपाकिस्तानची साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानलाला किंमत मोजावी लागत आहे. या दोन्ही देशांकडे भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे, मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
तुर्कीच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मे ते ऑगस्ट दरम्यान तुर्कीला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या एक तृतीयांशांनी घटली आहे. तर, 2024 मध्ये या कालावधीत जवळपास 1.36 लाख भारतीय पर्यटक तुर्कीला गेले होते. 2025 मध्ये ही संख्या केवळ 90,400 वर आली आहे.
यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यांतही भारतीय पर्यटकांची संख्या थोडीशी घटून 83,300 इतकी राहिली, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. यावरुन स्पष्ट होते की, तुर्कीविषयी भारतीयांचा कल हळूहळू कमी होत आहे.
‘बॉयकॉट’चा परिणाम
भारताने भूतकाळात नेहमीच तुर्कीला गरजेच्या वेळी मदत केली होती. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणे भारतीयांना अजिबात पसंत पडले नाही. याच कारणामुळे भारतीय नागरिकांनी तुर्की आणि अझरबैजानचा बहिष्कार (बॉयकॉट) सुरू केला.
मे महिन्यापासूनच बुकिंग रद्द करण्याचा क्रम सुरू झाला. अनेक मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठी फ्लाइट व हॉटेल सर्विसेस बंद केल्या. MakeMyTrip आणि EaseMyTrip सारख्या प्रमुख ट्रॅव्हल पोर्टल्सनीही या देशांकडे पाठ फिरवली.
अझरबैजानवरही मोठा परिणाम
अझरबैजान टुरिझम बोर्डच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल दरम्यान भारतातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये 33% वाढ झाली होती. पण, मे ते ऑगस्ट दरम्यान या संख्येत तब्बल 56% घट नोंदवली गेली. या कालावधीत अझरबैजानला भेट देणारे भारतीय पर्यटक फक्त 44,000 इतके राहिले. गेल्या वर्षी या काळात ही संख्या 1 लाखांच्या जवळपास होती. एकूणच काय तर, 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांत भारतीय पर्यटकांमध्ये 22% वार्षिक घट नोंदवली गेली आहे.