'ऑपरेशन सिंदूर' वेळी मीच रोखलं भारत-पाक अण्वस्त्र युद्ध! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:38 IST2026-01-21T09:38:16+5:302026-01-21T09:38:16+5:30

भारत-पाक शस्त्रसंधीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे.

Trump makes another big claim I was the one who prevented a India Pakistan nuclear war during Operation Sindoor | 'ऑपरेशन सिंदूर' वेळी मीच रोखलं भारत-पाक अण्वस्त्र युद्ध! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

'ऑपरेशन सिंदूर' वेळी मीच रोखलं भारत-पाक अण्वस्त्र युद्ध! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

Donald Trump On India-Pak War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून धक्कादायक विधानांमुळे जगभरात चर्चेत आले आहेत. आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक दावा केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर होते आणि केवळ आपल्या हस्तक्षेपामुळेच हे युद्ध टळले, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

"मी १० महिन्यांत ८ युद्धे रोखली"

आपल्या कामगिरीचा पाढा वाचताना ट्रम्प म्हणाले की, गेल्या १० महिन्यांत त्यांनी जगातील अशी ८ मोठी युद्धे रोखली जी कधीही संपणारी नव्हती. यात भारत-पाकिस्तान तणावाचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, "त्यावेळी दोन्ही देश अत्यंत आक्रमक झाले होते, ८ विमाने पाडली गेली होती. माझ्या मते, ते एकमेकांवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण अमेरिकेने दिलेली टॅरिफची धमकी आणि राजनैतिक दबावामुळे दोन्ही देशांना मागे हटणे भाग पडले."

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दाखला

ट्रम्प यांनी दावा केला की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतः त्यांना सांगितले की, ट्रम्प यांच्यामुळे १ कोटींहून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे, भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय ट्रम्प यांनी आतापर्यंत ५० पेक्षा जास्त वेळा घेतले आहे.

भारताने दावे फेटाळले

ट्रम्प यांच्या या दाव्यांना भारत सरकारने नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबतची शस्त्रसंधी हा नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यातील थेट चर्चेचा परिणाम होता. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची किंवा मध्यस्थाची भूमिका नव्हती. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते.

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची टोलेबाजी

यावेळी ट्रम्प यांच्या भाषणात नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याची सल पुन्हा एकदा दिसून आली. "मी ८ युद्धे रोखली आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले, यासाठी मला दरवेळी नोबेल मिळायला हवे होते," असे ते म्हणाले. नॉर्वे सरकारने आपल्याला जाणीवपूर्वक हा पुरस्कार दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, नॉर्वेच्या पंतप्रधानांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, नोबेल समिती स्वतंत्र असून सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसतो.
 

Web Title : ट्रंप का दावा: 'ऑपरेशन सिंदूर' में मैंने भारत-पाक परमाणु युद्ध रोका।

Web Summary : डोनाल्ड ट्रंप का दावा है कि 'ऑपरेशन सिंदूर' के दौरान उनके हस्तक्षेप से भारत और पाकिस्तान के बीच परमाणु युद्ध टला। भारत ने इस दावे को खारिज करते हुए कहा कि बातचीत द्विपक्षीय थी।

Web Title : Trump claims he averted India-Pakistan nuclear war during 'Operation Sindoor'.

Web Summary : Donald Trump claims his intervention prevented a nuclear war between India and Pakistan during 'Operation Sindoor'. He asserts to have saved millions of lives through diplomatic pressure, a claim India dismisses, stating discussions were bilateral.