सिंधू संस्कृतीच्या काळात म्हणजेच साधारणपणे ३००० वर्षांपूर्वी अफगाणिस्तान हे हिंदूंचे घर म्हणून ओळखले जात होते. येथे हिंदू समाज इतर अनेक समाजांना सोबत घेऊन गुण्यागोविंदाने नांदत होता. मात्र आज येथे केवळ काही शेच हिंदू शिल्लक राहिले आहे. आज अफगाणिस्तानात ९९.७% हून अधिक लोकसंख्या मुस्लीम समाजाची आहे आणि येथे तालिबान या दहशतवादी संघटनेचे राज्य आहे.
येथे तालिबान सत्तेवर आल्यापासून हिंदू आणि शीख आदी अल्पसंख्यक समाजाला लक्ष्य केले जात आहे. यामुळेच येथील अल्पसंख्याकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अफगाणिस्तान हा एकेकाळी एक असा देश होता जिथे विविध भाषा, धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहत होते. मात्र, धर्मांधता आणि सततच्या लढाया आणि गृहयुद्धामुळे हे सर्व हळूहळू संपत गेले.
सातत्याने कमी होत गेले हिंदू, शीख -अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख लोकसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. १९७० मध्ये तेथे सुमारे ७ लाख हिंदू आणि शीख राहत होते. मात्र, १९८० च्या दशकात त्यांची संख्या केवळ २ ते ३ लाखांपर्यंत कमी झाली. टोलो (TOLO) न्यूजच्या वृत्तानुसार, गेल्या ३० वर्षांत जवळजवळ ९९% हिंदू आणि शीख अफगाणिस्तान सोडून गेले आहेत. येथे १९९० च्या दशकात मुजाहिदीन सत्तेवर आले तेव्हा युद्ध सुरू होते, तेव्हा त्यांची संख्या केवळ १५,००० उरली होती. तालिबानच्या काळातही हीच परिस्थिती कायम होती. आता अफगाणिस्तानात केवळ १,३५० हिंदू आणि शीखच उरले आहेत, असे मानले जाते.
केवळ एक हिंदू मंदिर -माध्यमांतील वृत्तांनुसार, आता अफगाणिस्तानात केवळ २ ते ४ गुरुद्वारा आणि एकच हिंदू मंदिर शिल्लक आहे. पूर्वी ही धार्मिक स्थळे हिंदू आणि शीख समुदायासाठी सुरक्षित स्थान मानली जात होती. मात्र आता परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, येथील लोकांनी ही मंदिरे आणि गुरुद्वारा केवळ प्रार्थनास्थळेच नव्हे, तर आपली राहण्याचे ठिकाणेही बनवली आहेत.
काबूल येथे मार्च २०२० मध्ये एका शीख गुरुद्वाऱ्यावर जवळजवळ ६ तास हल्ले झाले. या हल्ल्यांत २५ जण ठार तर ८ जण जखमी झाले होते. हे हल्ल्यांची जगभरात चर्चा झाली. यानंतर, मोठ्या संख्येने लोकांनी अफगाणिस्तान सोडला.