"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:54 IST2025-10-03T14:36:38+5:302025-10-03T14:54:32+5:30
Putin Trump News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आण्विक चाचण्या करण्यावरून अमेरिकेला धमकी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने युक्रेनला मिसाईल्स दिल्या तर संघर्षाचा भडका उडेल, असेही पुतीन म्हणाले आहेत.

"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
"काही देश आण्विक चाचण्या करण्याची तयारी करत आहेत. जर अण्वस्त्र असलेल्या महासत्तेने जर आण्विक चाचण्या केल्या, तर रशियाही या चाचण्या करेल", अशी धमकीच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला दिली आहे. अमेरिकेने युक्रेनला क्षेपणास्त्रे दिली, तर युद्धाचा भडका उडेल, असा इशाराही पुतीन यांनी दिली. ते भू-राजकीय तज्ज्ञांच्या चर्चेत बोलत होते.
पुतीन म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला टॉमहॉक मिसाईल्सचा पुरवठा केला, तर ते धोकायदायक असेल. युद्धाचा नव्याने भडका उडेल.
ट्रम्प यांच्या 'कागदी वाघ'ला पुतीन यांनी दिलं उत्तर
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाच्या सैन्याला कागदी वाघ म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या टीकेलाही पुतीन यांनी उत्तर दिले.
ते उपस्थितांना म्हणाले, "आपण (रशिया) कागदी वाघ आहोत का? जर आपण कागदी वाघ आहोत, तर मग नाटो काय आहे?", असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांना डिवचले.
"आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपला आत्मविश्वास टिकून ठेवणे. आणि आपल्या आत्मविश्वास आहे", असे विधान पुतीन यांनी केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी रशियाबद्दल बोलताना म्हटले होते की, युरोप आणि नाटोच्या पाठिंब्यामुळे, तसेच रशियाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आणून युक्रेन त्याची मूळ सीमा परत मिळवू शकतो. जिथून हे युद्ध सुरू झाले होते.