इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:39 IST2025-10-13T11:39:28+5:302025-10-13T11:39:28+5:30
Hamas- Dughmush Conflict: दुघमुश कबीला हा गाझातील प्रमुख कबील्यांपैकी एक असून, त्यांचे हमाससोबतचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत.

इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या गाझामध्ये आता अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. गाझा शहरातील हमास सुरक्षा दल आणि स्थानिक 'दुघमुश' (Dughmush) कबील्याच्या सशस्त्र सदस्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत दोन्ही बाजूचे मिळून कमीतकमी २७ लोक मारले गेले आहेत. इस्त्रायली मोहीम थांबल्यानंतर गाझा पट्टीत झालेला हा सर्वात हिंसक अंतर्गत संघर्ष मानला जात आहे.
गाझा सिटीमधील 'तेल अल हवा' परिसरात हा भीषण गोळीबार सुरू आहे. हमासच्या गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुरक्षा दलांनी कबील्याच्या सशस्त्र सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला होता, ज्यामुळे ही चकमक झाली. या संघर्षात हमासचे ८ सदस्य आणि दुघमुश कबील्याचे १९ सशस्त्र सैनिक मारले गेले आहेत.
दुघमुश कबीला हा गाझातील प्रमुख कबील्यांपैकी एक असून, त्यांचे हमाससोबतचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. या नव्या संघर्षामागे जागेचा वाद असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. इस्त्रायली हल्ल्यात घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर या कबील्याच्या लोकांनी जॉर्डनच्या जुन्या हॉस्पिटलच्या इमारतीत आश्रय घेतला होता. मात्र, हमासच्या सैनिकांना ती जागा आपला नवा अड्डा बनवण्यासाठी रिकामी करायची होती, यातूनच वाद सुरू झाला, असा दावा दुघमुशने केला आहे.
तर हमासच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांचे दल केवळ परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते आणि कोणत्याही सशस्त्र कारवायांना तीव्रतेने उत्तर दिले जाईल.