विशेष लेख: मेलानिया ट्रम्प यांची फिल्म फ्लॉप! बुकिंग शून्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 07:33 IST2026-02-03T07:32:45+5:302026-02-03T07:33:41+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट असू द्या, त्याचा ते स्वत: किती गाजावाजा करतात, जगाचं लक्ष स्वत:कडे कसं वेधून घेतात आणि त्याचा ते कसा प्रोपोगंडा करतात, हे आता साऱ्यांनाच माहीत झालं आहे.

विशेष लेख: मेलानिया ट्रम्प यांची फिल्म फ्लॉप! बुकिंग शून्य!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट असू द्या, त्याचा ते स्वत: किती गाजावाजा करतात, जगाचं लक्ष स्वत:कडे कसं वेधून घेतात आणि त्याचा ते कसा प्रोपोगंडा करतात, हे आता साऱ्यांनाच माहीत झालं आहे. त्यांची पत्नी; फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांची पहिलीच डॉक्युमेंट्री फिल्म त्याला कशी अपवाद असेल? मेलानिया ट्रम्प यांची ‘मेलानिया : ट्वेंटी डेज टू हिस्ट्री’ ही डॉक्युमेंट्री फिल्म नुकतीच रिलिज झाली. ही फिल्म तयार होण्यापूर्वी मेलानिया आणि खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचा खूपच गाजावाजा केला होता. ही फिल्म कधी रिलीज होणार याची त्यांनाही मोठी प्रतीक्षा होती.. त्याला कारणही तसंच होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीच्या आधीच्या, मेलानिया ट्रम्प यांच्या दैनंदिन आयुष्याच्या २० दिवसांवर ही फिल्म केंद्रित आहे. मेलानिया ट्रम्प स्वतः या फिल्मच्या कार्यकारी निर्माता आहेत.
आता विचार करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची बायको, त्यांच्या आयुष्यावरची पहिलीच फिल्म, निर्मितीही त्यांचीच, त्यात मेलानियांच्या खासगी आयुष्याची दाखवण्यात आलेली झलक... म्हणजे किती सस्पेन्स! सोन्याची अंडी देऊ शकणारी ही फिल्म कोण सोडणार? ॲमेझॉननं लगोलग या फिल्मचे हक्क विकत घेतले आणि मार्केटिंगसाठीही प्रचंड खर्च केला. किती असावी ही रक्कम? - तब्बल ६८७ कोटी रुपये! लक्षात घ्या, ही रक्कम फक्त फिल्मचे हक्क आणि मार्केटिंगसाठी खर्च करण्यात आली. फिल्मच्या प्रत्यक्ष निर्मितीचा खर्च वेगळाच! कोणत्याही डॉक्युमेंटरीसाठी हा एवढा मोठा खर्च डोळे पांढरे करण्यासारखाच!
शेवटी परवा एकदाची ही फिल्म रिलीज झाली.. आणि खरोखरच सगळ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली! ही फिल्म पाहण्यासाठी लोकांच्या कशा रांगा लागतील, किती कोटींचा गल्ला ही फिल्म गोळा करील, याचे अंदाज बांधले जात होते, पण प्रत्यक्षात काय झालं? ही फिल्म पाहण्यासाठी अक्षरश: कुणी म्हणजे कुणीच फिरकलं नाही. जिथे-जिथे आणि ज्या-ज्या सिनेमागृहांत ही फिल्म दाखवली गेली, त्या त्या प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांचा अक्षरशः दुष्काळ!
लंडनमध्ये प्रीमिअरआधी इस्लिंग्टनमधील एका सिनेमागृहात दुपारच्या शोसाठी फक्त एकच तिकीट विकलं गेलं, तर त्याच ठिकाणी संध्याकाळच्या शोसाठी केवळ दोन तिकिटं विकली गेली. प्रमुख मल्टिप्लेक्समधली स्थिती आणखी निराशाजनक होती. लंडनमधील ‘व्ह्यू’ थिएटर्समध्ये ठरवण्यात आलेल्या सर्व स्क्रीनिंगसाठी ॲडव्हान्स बुकिंग शून्य होती. ब्रिटिश फिल्म वर्गीकरण मंडळाकडून रिलीजला मंजुरी मिळूनही, अमेरिकेत जोरदार प्रचार होऊनही आणि व्हाइट हाऊसमध्ये प्रीमियर होऊनही प्रेक्षकांनी या फिल्मकडे पाठ फिरवली.
फिल्म रिलीज होण्यापूर्वी मेलानिया यांचं म्हणणं होतं, ‘प्रत्येकाला माझी गोष्ट जाणून घ्यायची आहे. त्यामुळे या फिल्मला लोक तोबा गर्दी करतील!’ प्रत्यक्षात झालं उलटंच! ब्रिटनच्या स्तंभलेखिका आणि फिल्म समीक्षक जुडिथ वुड्स यांनी ज्या सिनेमागृहात ही फिल्म पाहिली तिथे त्यांच्यासह फक्त पाच प्रेक्षक होते. त्यांपैकी एक महिला तर केवळ थंडीपासून वाचण्यासाठी सिनेमागृहात आली होती! जुडिथ वुड्स यांच्या मते ही डॉक्युमेंट्री कमी आणि प्रोपोगंडा जास्त आहे. मेलानियांचं थंड हसू, रात्री गडद सनग्लासेस घालणं, कुठल्याही भावना नाहीत.. यांमुळे प्रेक्षकांनी फिल्मकडे पाठ फिरवली.