दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 06:17 IST2024-12-30T06:16:25+5:302024-12-30T06:17:20+5:30
पक्ष्याने धडक दिल्यामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने केले आपत्कालीन लँडिंग, धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान वेगाने कुंपणाच्या भिंतीवर धडकले...

दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू
सेऊल : दक्षिण कोरियात एका विमानतळावर उतरताना घसरून प्रवासी विमानाला लागलेल्या भीषण आगीत १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात ८५ महिला व ८४ पुरुषांचा समावेश आहे. १० जणांची ओळख अद्याप पटू शकली नव्हती. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. फक्त दोघांचा जीव वाचू शकला. चालक दलाच्या दोघांना सुरक्षित काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ च्या सुमारास मुआन शहरातील विमानतळावर ‘जेजू एअर’च्या विमानाला हा अपघात झाला. १५ वर्षे जुने बोईंग-७३७-८०० हे जेट विमान बँकॉकहून परतत असताना धावपट्टीवर घसरले आणि शेवटी असलेल्या कुंपणाच्या भिंतीला धडकले. विमान धडकताच प्रचंड आग लागली.
विमानाचा ब्लॅक बॉक्स व कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरच्या माध्यमातून अपघाताची कारणे शोधली जातील. १९९७ मध्ये कोरियन एअरलाइन्सचे एक विमान ग्वाममध्ये कोसळून त्यात २२८ प्रवासी ठार झाले होते.
तब्बल ३२ अग्निशामक वाहनांनी विझविली आग
विमान उतरताच पेटल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या ३२ वाहनांनी १५६० कर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणली. परंतु, तोवर अनेक प्रवाशांचा भाजून मृत्यू झाला होता. या अपघातात विमान पूर्ण नष्ट झाले आहे. विमानाचा अगदी शेवटचा भाग थोडा शिल्लक आहे.
वैमानिकाला इशारा?
- या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात असून प्रारंभिक माहितीनुसार, पक्षी धडकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे मानले जात आहे.
- कारण, उतरण्यापूर्वी काही वेळ नियंत्रण कक्षाने पक्ष्यांबाबत वैमानिकाला इशारा देणारा संदेश पाठविला होता.
बेली लँडिंग म्हणजे काय? का झाले नाही यशस्वी?
विमान उतरताना चाके उघडली नाहीत तर आपत्कालीन स्थितीत ते उतरवले जाते. याला बेली लँडिंग म्हणतात. अशा स्थितीत विमानाची बॉडीच जमिनीवर धडकून घसरत जाते. या अपघातात या प्रकारे लँडिंग झाले; परंतु वेग कमी झाला नाही.
कॅनडात विमान धावपट्टीवरून घसरले : कॅनडामध्ये शनिवारी रात्री (भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ८ वाजता) हॅलिफॅक्स विमानतळावर उतरताना एक प्रवासी विमान घसरले. लँडिंग करताना विमानाचा एक भाग धावपट्टीच्या दिशेने झुकला. त्यामुळे विमानाच्या पंखाला आग लागली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या महिन्यातील अपघात असे...
- २५ डिसेंबर : अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकताउ विमानतळाजवळ क्रॅश होऊन ३८ लोक ठार झाले.
- २२ डिसेंबर : ब्राझीलमध्ये एकाच कुटुंबातील १० जणांचा एका छोट्या खासगी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेत जमिनीवर १७ लोक जखमी झाले.
- २२ डिसेंबर : नॉर्थ कोस्ट एव्हिएशनकडून चालवले जाणारे आयलँडर हे विमान पापुआ न्यू गिनीमध्ये कोसळून सर्व पाच लोक ठार झाले.
- १७ डिसेंबर : द बाँबारडीयर विमान अर्जेंटिनामधील सन फर्नांडो विमानतळाजवळ कोसळून दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.