तारिक रहमान की जमात...? बांगलादेशात आज ३०० जागांवर मतदान; 1981 उमेदवार मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 01:45 IST2026-02-12T01:43:03+5:302026-02-12T01:45:27+5:30
यापूर्वी, २०२४ मध्ये येथे निवडणूका पार पडल्या होत्या. तेव्हा शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या होत्या. मात्र, ऑगस्ट 2024 च्या सत्तापालटानंतर, आता पुन्हा एकदा येथे निवडणुका पार पडत आहेत.

तारिक रहमान की जमात...? बांगलादेशात आज ३०० जागांवर मतदान; 1981 उमेदवार मैदानात
बांगलादेशात आज गुरुवारी (१२ फेब्रुवारी २०२६) १३ व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापूर्वी, २०२४ मध्ये येथे निवडणूका पार पडल्या होत्या. तेव्हा शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या होत्या. मात्र, ऑगस्ट 2024 च्या सत्तापालटानंतर, आता पुन्हा एकदा येथे निवडणुका पार पडत आहेत.
महत्वाचे म्हणजे, यावेळी लोकशाही प्रक्रियेसोबतच महत्त्वपूर्ण 'जनमत संग्रह' देखील पार पडणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना संवैधानिक सुधारणांच्या (जुलै चार्टर) पॅकेजवर 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर द्यायचे आहे. जर 'हो' च्या बाजूने कौल मिळाला, तर आगामी नवीन सरकारला हे सुधारणा पॅकेज संसदेत कायदेशीररित्या लागू करणे बंधनकारक असेल.
सकाळी ७:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेत १२ कोटी ७६ लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. बांगलादेशात बॅलेट पेपरद्वारे निवडणूक होत असून, मतदान संपताच मतमोजणीला सुरुवात होईल. विदेशातील बांगलादेशी नागरिकांसाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक पोस्टल बॅलेट जारी करण्यात आले आहेत.
असं आहे उमेदवार अन् मतदारांचं गणित -
एकूण मतदारांमध्ये साधारणपणे ६.४७ कोटी पुरुष तर ६.२८ कोटी महिला आणि १,२३० ट्रान्सजेंडर मतदार आहेत. युवा मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरतील. ३०० जागांसाठी ५९ राजकीय पक्षांचे आणि अपक्ष मिळून एकूण १,९८१ उमेदवार रिंगणात आहेत.
सत्ता स्थापनेसाठी १५१ जागांची आवश्यकता असून, महिलांसाठी अतिरिक्त ५० जागा राखीव आहेत. ज्या राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या मतांच्या प्रमाणात वाटल्या जातात. १७३ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशात ९० टक्के मुस्लिम आणि ९ टक्के हिंदू लोकसंख्या असून, ६४ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे मतदान पार पडत आहे.