Taliban : हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या, तालिबान-पाकिस्तानला मोठा धक्का, पुन्हा संघर्ष सुरू होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:23 AM2021-11-03T10:23:43+5:302021-11-03T10:24:23+5:30

Taliban : काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमदुल्ला मुखलिस हा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कार्यालयात प्रवेश करणारा पहिला होता. हमदुल्ला मुखलिस याचे घनी यांच्या खुर्चीवर बसलेले फोटो व्हायरल झाले होते.

Taliban Haqqani Network Kabul Corps Commander Hamdullah Mukhlis Killed In ISIS K Attack In Afghanistan | Taliban : हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या, तालिबान-पाकिस्तानला मोठा धक्का, पुन्हा संघर्ष सुरू होणार का?

Taliban : हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या, तालिबान-पाकिस्तानला मोठा धक्का, पुन्हा संघर्ष सुरू होणार का?

googlenewsNext

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबनी सत्ता आल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला सर्वात मोठा झटका बसला आहे. तालिबान सरकारमध्ये गृहमंत्री बनलेल्या हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांचा मुख्य लष्करी रणनीतीकार हमदुल्ला मुखलिस आणि काबूलचा कमांडर हमदुल्ला मुखलिस हा एका भीषण आत्मघातकी हल्ल्यात ठार झाला आहे. काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमदुल्ला मुखलिस हा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कार्यालयात प्रवेश करणारा पहिला होता. हमदुल्ला मुखलिस याचे घनी यांच्या खुर्चीवर बसलेले फोटो व्हायरल झाले होते. 

काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हमदुल्ला मुखलिस हा तालिबानच्या विशेष दल बद्री ब्रिगेडचा कमांडरही होता. या ब्रिगेडला काबूलमधील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. तालिबान कमांडरच्या मृत्यूने हक्कानी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी हमदुल्ला पाकटिका आणि खोश्त प्रांतात तालिबानचा शॅडो गव्हर्नर होता.

'तालिबानी नेतृत्व हादरले असावे'
आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, मात्र आयएसआयएस (ISIS) संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा आत्मघाती हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी ट्विट केले की, 'आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना आता त्यांचे पहिले सर्वात महत्त्वाचे लक्ष्य साध्य करण्यात यश आले आहे. हमदुल्ला हा तालिबानचा सर्वात करिष्माई नेता होता. यामुळे तालिबानी नेतृत्व हादरले असावे.' याचबरोबर, येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे बिलाल म्हणाले. तसेच, 'ही अफगाणिस्तानातील नव्या व्यवस्थेची सुरुवात आहे का? याचा तालिबानच्या मनोबलावर परिणाम होईल का?  या हल्ल्यामुळे आयएसआयएसचे मनोबल वाढेल आणि तालिबान नेतृत्वावर आणखी हल्ले होतील का?' असे सवाल केले आहेत.

अंदाधुंद गोळीबार 
काबूलमधील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयात बंदूकधाऱ्यांच्या एका गटाने हल्ला करून अंदाधुंद गोळीबार केला, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्लेखोर नंतर तालिबानी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. यादरम्यान तालिबानचा टॉप कमांडर मौलवी हमदुल्ला मुखलिसही मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तो तालिबानच्या काबूल मिलिट्री कोरचा प्रमुख होता.

'15 मिनिटांत हल्लेखोरांना मारले'
तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, 400 खाटांच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा बॉम्बस्फोट झाला. यानंतर आयएसआयएसच्या बंदुकधारी गटाने हल्ला केला, ज्यातील सर्वजण 15 मिनिटांत मारले गेले. तालिबानच्या स्पेशल फोर्स कमांडो टीमला हेलिकॉप्टरने रुग्णालयाच्या आवारात सोडण्यात आले. यामुळे हल्लेखोरांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखले गेले आणि सर्वांना गेटवर गोळ्या घालून ठार करण्यात आले, असेही जबिहुल्ला  मुजाहिद यांनी सांगितले.
 
'आयएसआयएस'वर हल्ल्याचा संशय
आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, या हल्ल्यामागे आयएसआयएस संघटनेचा हात असल्याचे म्हटले जात आहे. या दहशतवादी संघटनेने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत. यातील सर्वात भीषण हल्ला दोन शिया मशिदींवर झाला होता. अफगाणिस्तानातील तालिबानच्या नियंत्रणासाठी आयएसआयएस हा सर्वात मोठा धोका म्हणून समोर आला आहे.

तालिबानचा टॉप कमांडर
हमदुल्ला मुखलिस हा तालिबानचा टॉप कमांडर होता. हमदुल्ला मुखलिस याने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील समन्वयासाठीही काम केले. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कचा नंबर दोन असलेल्या अनस हक्कानीवर सोपवण्यात आली. नंतर राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी हमदुल्ला मुखलिस याच्याकडे सोपवण्यात आली होती.

Web Title: Taliban Haqqani Network Kabul Corps Commander Hamdullah Mukhlis Killed In ISIS K Attack In Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.