Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:37 IST2025-11-28T16:34:34+5:302025-11-28T16:37:28+5:30
Sri Lanka Flood : श्रीलंकेमध्ये परिस्थिती गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे.

Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
श्रीलंकेमध्ये परिस्थिती गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ६०० हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालं. श्रीलंकेतील पुरामुळे ६० लोक बेपत्ता आहेत.
अल जझीराच्या रिपोर्टनुसार, श्रीलंकेच्या मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशात परिस्थिती सर्वात गंभीर आहे. बादुल्ला आणि नुवारा एलिया सारख्या चहा उत्पादक भागात वारंवार भूस्खलन होत आहे, ज्यामुळे तेथे राहणाऱ्या कुटुंबांना मोठा त्रास होत आहे. अनेक घरं चिखलाखाली गाडली गेली आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे या दोन्ही जिल्ह्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
लोकांना घराबाहेर पडू नये असा सल्ला
सतत बिघडत चाललेल्या परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केलं आहे की, सर्व सरकारी कार्यालये आणि शाळा सध्या बंद राहतील. नद्या आणि जलाशयांमध्ये पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर आहे, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
भूस्खलन आणि पुरामुळे मुख्य रस्ते बंद
भूस्खलन आणि पुरामुळे अनेक मुख्य रस्ते बंद झाले आहेत. काही ठिकाणी रेल्वे रुळांवर ढिगारा साचला आहे, ज्यामुळे अनेक गाड्या थांबल्या आहेत. राजधानी कोलंबो आणि दुर्गम जिल्ह्यांमधील वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे.
अनेक गावं अजूनही पाण्याखाली
हेलिकॉप्टर छतावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. नौदलाचं पथक बोटींचा वापर करून पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत. अनेक गावं अजूनही पाण्याखाली आहेत, त्यामुळे बचाव कार्य सुरूच आहे.