हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 07:46 IST2025-07-21T07:45:22+5:302025-07-21T07:46:09+5:30

सध्या हे हेरगिरी प्रकरण वेगळ्याच कारणानं गाजतं आहे. अफगाणिस्तानच्या अनेक लोकांवर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Spying, 'honeytrap' and deportation of lakhs! Afghan refugees' plight due to suspicion of spying | हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल

हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल

कोणत्या गुप्तहेरांची नावं तुम्हाला माहीत आहेत, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांवर उदार होऊन हेरगिरी केली? यातल्या काही हेरांवर चित्रपटही निघाले आहेत आणि ते बरेच गाजले आहेत. असेही काही हेर आहेत, ज्यांनी आपल्याच देशाशी गद्दारी करून देशाची सिक्रेट्स शत्रूराष्ट्राला पुरवली. मुळात हेरगिरीचं कामच असं, ज्यात तुमच्या जिवाची काहीही शाश्वती नसते. अत्यंत धोकेदायक आणि क्षणाक्षणाला मृत्यूची भीती. तरीही अनेकांनी हे जोखमीचं काम निवडलं आणि तडीसही नेलं. त्यात अनेकांना आपल्या प्राणांची बाजीही लावावी लागली. 

जगात जे सर्वांत नावाजलेले गुप्तहेर आहेत, त्यात अनेकांची नावं घेतली जातात. अमेरिकेचे जुलियस आणि एथेल रोसेनबर्ग, ब्रिटनची नूर इनायत खान, रशियाचा रिचर्ड सोर्गे, मूळचा जर्मन, पण सोव्हिएत रशियासाठी हेरगिरी करणारा क्लॉस फुच्स, चीनची शी पेई पू, आधी सीआयए एजंट असलेला आणि नंतर सेव्हिएत रशियासाठी हेरगिरी करणारा एल्ड्रिच एम्स, दोन्ही महायुद्धात हेरगिरी करणारा आणि ‘ब्लॅक पँथर’ या नावानं परिचित असणारा जर्मनीचा फ्रेडरिक जॉबर्ट डुकॉस्न, ‘माता हरी’ नावानं प्रसिद्ध असणारी ‘डबल एजंट’ आंतरराष्ट्रीय डान्सर मार्गरेट गीर्तोईदा जेले; जिला जर्मनीसाठी हेरगिरी करण्याच्या कारणावरून आणि ‘हनिट्रॅप’मध्ये अडकवल्यामुळे वयाच्या ४१ व्या वर्षी फ्रान्सच्या सैनिकांनी गोळ्या घातल्या, पण ती नेमकी कोणासाठी काम करीत होती, कोणत्या देशाची गुप्तहेर होती, जर्मनीची की फ्रान्सची, हे रहस्य तिच्या मृत्यूनंतरही आजतागायत गूढ बनून आहे. असे अनेक गुप्तहेर चांगल्या-वाईट कारणानं इतिहासातल्या दंतकथा बनले आहेत.

पण सध्या हे हेरगिरी प्रकरण वेगळ्याच कारणानं गाजतं आहे. अफगाणिस्तानच्या अनेक लोकांवर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेषत: इराणनं. इस्रायल आणि इराण यांच्यात जून महिन्यात १२ दिवस चाललेल्या सशस्त्र संघर्षानंतर ‘अंतर्गत सुरक्षे’चं कारण देत इराणनं अनेक प्रवाशांवर कठोर कारवाई केली आहे. इराणनं दावा केला आहे, की अनेक अफगाण नागरिक इस्रायलसाठी हेरगिरी करत आहेत. इराणची अनेक प्रकारची संवेदनशील माहिती त्यांनी इस्रायलला पुरवली आहे. देशाच्या सुरक्षेलाच त्यामुळे धोका पोहोचला आहे.

इराणनं अफगाणी नागरिकांवर केेलेल्या हेरगिरीच्या आरोपांसंबंधात अजून कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. तरीही इराणनं आपली ‘कारवाई’ सुरू केली आहे. हेरगिरी आणि इराणमध्ये अवैध प्रवेश तसंच तिथे बेकायदा राहात असल्याच्या कारणावरून इराणनं जुलै महिन्यात १६ दिवसांत तब्बल पाच लाख अफगाणी नागरिकांची हकालपट्टी केली आहे. त्याआधी आणि आताही ही हकालपट्टी अजून सुरूच आहे.  याआधी मार्च २०२५ मध्येच इराणनं जे अफगाण नागरिक इराणमध्ये बेकायदेशीरपणे राहात आहेत त्यांनी सहा जुलैपर्यंत देश सोडून जावा, नाहीतर त्यांना इराणमधून बळजबरी हाकलण्यात येईल, अशी घोषणा केली होती.  

याच कारणानं पाकिस्ताननंही लाखो अफगाणी नागरिकांना आपल्या देशातून हुसकावून लावलं आहे. इराण आणि पाकिस्ताननं केवळ २०२५मध्ये आजपर्यंत सुमारे १६ लाख नागरिकांची हकालपट्टी केली आहे. या वर्षअखेरीपर्यंत हा आकडा तीस लाखांपर्यंत जाऊ शकतो.

Web Title: Spying, 'honeytrap' and deportation of lakhs! Afghan refugees' plight due to suspicion of spying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.