भारताकडे येणाऱ्या प्लेनवर अमेरिकेचा हल्ला, 'War Crime' म्हणत इराण भडकला; दिल्लीत कशासाठी येत होतं विमान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 08:37 IST2026-03-31T08:37:34+5:302026-03-31T08:37:55+5:30
हल्ला झाला तेव्हा हे विमान मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, मानवतावादी मदतीवर झालेला हा थेट हल्ला 'युद्ध गुन्हा' (War Crime) असल्याचे म्हटले आहे.

भारताकडे येणाऱ्या प्लेनवर अमेरिकेचा हल्ला, 'War Crime' म्हणत इराण भडकला; दिल्लीत कशासाठी येत होतं विमान?
अमेरिकेने इराणमधील मशहद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात भारताकडे येणाऱ्या एका नागरी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, इराणच्या 'महान एअर'चे हे विमान, भारतातील मानवतावादी मिशनचा एक भाग म्हणून औषधे आणि वैद्यकीय सामग्री घेण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचणार होते. हल्ला झाला तेव्हा हे विमान मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, मानवतावादी मदतीवर झालेला हा थेट हल्ला 'युद्ध गुन्हा' (War Crime) असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, भारत आणि इराण मानवतावादी कार्यात सध्या एकमेकांना सहकार्य करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच भारताकडून इराणला मदत साहित्य पाठवण्यात आले होते. भारतीय नागरिकांनीही इराणसाठी मोठ्या प्रमाणावर मदत गोळा केली आहे. यासंदर्भात इराणने भारतीय नागरिकांचे आभारही मानले आहेत. मात्र, या ताज्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील मदतकार्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
"नागरी वस्तूंवर हल्ला करणे हा 'युद्ध गुन्हा'" -
इराणच्या नागरी उड्डयन संघटनेने यासंदर्भात एक अधिकृत निवेदनही जारी करत, "नागरी विमानाला लक्ष्य करणे हे १९४४ च्या शिकागो कन्व्हेन्शन आणि १९७१ च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शनमधील आंतरराष्ट्रीय नियमांचे उघड उल्लंघन आहे. तसेच जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या प्रोटोकॉल १ मधील कलम ५२ चा हवाला देत, नागरी वस्तूंवर हल्ला करणे हा 'युद्ध गुन्हा' आहे," असे इराणने म्हटले आहे.
अमेरिकाचे गंभीर आरोप -
तर दुसरीकडे, अमेरिकेने अद्याप तरी या हल्ल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. महत्वाचे म्हणजे, महान एअर ही इराणची मोठी खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीवर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. कंपनीचे संबंध इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोरशी (IRGC) असल्याचा आरोप वॉशिंग्टनने केला आहे. मात्र, हा आरोप तेहरान नेहमीच फेटाळत आला आहे.