सौदी अरेबियातील स्फोट घडवणारा सुसाइड बॉम्बर बीडचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 14:05 IST2018-05-03T14:05:36+5:302018-05-03T14:05:36+5:30
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 2016 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे महाराष्ट्रातील बीडमधील फय्याझ कागझी या तरुणाचा हात असल्याचे वृत्त समोर आले आहे.

सौदी अरेबियातील स्फोट घडवणारा सुसाइड बॉम्बर बीडचा
मुंबई - सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 2016 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे महाराष्ट्रातील बीडमधील फय्याझ कागझी या तरुणाचा हात असल्याचे वृत्त समोर आले आहे. या आत्मघातकी स्फोटात ठार झालेल्या दहशतवाद्याचे डीएनएचे नमुने फय्याझच्या कुटुंबाशी जुळल्याने हा हल्ला काझगीनेच घडवल्याचे स्पष्ट झाले आहे.
फय्याझ कागझी हा 2004 साली बीडमधून पळाला होता. यानंतर तो लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. 2008 च्या मुंबईवरील साखळी बॉम्बस्फोटात व 2010 च्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात देखील त्याचा सहभाग होता. याशिवायही अनेक गुन्ह्यांमध्ये एटीएस त्याचा शोध घेत होती.
4 जुलै 2016 रोजी जेद्दाह येथील अमेरिकेचे दूतावास, शिया मुस्लिमांचा कातिफ दर्गा, मदिना येथील दर्ग्याजवळ तीन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात दोन सैनिक जखमी झाले होते. मदिना येथे बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. सौदी बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणेने हा फोटो जगभरातील सुरक्षा यंत्रणांना पाठवला होता.
यावेळी एटीएसला या फोटोतील व्यक्तीचा चेहरा फय्याझ कागझीशी मिळताजुळता असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांना जाणवले. त्यामुळे एटीएसने राष्ट्रीय तपास संस्थेच्या मदतीने फय्याझच्या बीडमधील कुटुंबीयांचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने सौदी अरेबियात ठार झालेल्या दहशतवाद्याच्या डीएनएशी जुळल्यानं मदिना येथे बॉम्बस्फोट घडवणारा हा फय्याझ कागझीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.