सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:10 IST2026-01-12T16:10:03+5:302026-01-12T16:10:45+5:30
५,२०१ लोकांना त्यांच्या हद्दपारीपूर्वी प्रवास व्यवस्था पूर्ण करण्यासाठी स्थानांतरित करण्यात आले आहे म्हणजेच त्यांना लवकरच हद्दपार केले जाईल.

सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
रियाद - सौदी अरेबियात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरोधात मोठं ऑपरेशन सुरू आहे. केवळ जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सौदीत १८ हजार ८३६ स्थलांतरिकांना अटक करण्यात आली. त्यातील १० हजाराहून अधिक लोकांना देशाबाहेर काढले आहे. सौदीत राजाच्या आदेशावर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरोधात शोध मोहिम राबवली जात आहे. कामगार कायद्यासह सीमा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना देशाबाहेर काढण्याचा आदेश आहे. १ ते ७ जानेवारी या काळात सुरक्षा दल आणि सरकारी संस्थांनी ही संयुक्त कारवाई केली.
एका माहितीनुसार, ज्या लोकांना अटक केली आहे त्यातील ११ हजार ७१० लोकांना रहिवासी कायद्याचे उल्लंघन केले आहे तर ४ हजार २३९ नागरिकांनी सीमा कायद्याचे उल्लंघन केले आहे. २ हजार ८८७ लोकांनी कामगार कायद्याचे उल्लंघन केले होते. ज्यातील बहुतांश लोकांना देशाबाहेर काढण्यात आले आहे. उरलेल्या लोकांवर अजूनही कारवाई सुरू आहे. त्यांनाही सौदी बाहेर काढण्याची तयारी होत आहे. सौदीत १० हजार १९५ लोकांना याआधीच डिपोर्ट करण्यात आले आहे. २० हजार ९५६ उल्लंघन करणाऱ्यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी डिप्लोमॅटिक मिशनकडे पाठवले आहे.
५,२०१ लोकांना त्यांच्या हद्दपारीपूर्वी प्रवास व्यवस्था पूर्ण करण्यासाठी स्थानांतरित करण्यात आले आहे म्हणजेच त्यांना लवकरच हद्दपार केले जाईल. १,७४१ लोकांना बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. यापैकी ३९ टक्के विस्थापित येमेनी, ६० टक्के इथिओपियन नागरिक आणि एक टक्के इतर देशांचे नागरिक होते. याव्यतिरिक्त बेकायदेशीरपणे देश सोडण्याचा प्रयत्न करताना ४६ लोकांना ताब्यात घेण्यात आले असं सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सौदी अरेबिया आता बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. बेकायदेशीर रहिवाशांना वाहतूक, निवास किंवा रोजगार दिल्याबद्दल १९ जणांना अटक करण्यात आली आहे. सौदी गृह मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार या मोहिमेचा भाग म्हणून सध्या २८,२२० पुरुष आणि १,६०३ महिलांसह २९,८२३ परदेशी लोकांची चौकशी केली जात आहे. सौदी मंत्रालयाने कडक भूमिका घेतली आहे. जे कोणी अवैध लोकांना वाहतूक, निवास किंवा रोजगार देईल आणि त्यांना बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्यास मदत करेल त्याला १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख सौदी रियालपर्यंत दंड होऊ शकतो. गुन्ह्यात वापरलेली वाहने किंवा मालमत्ता देखील जप्त केली जाऊ शकते.