पुतीन यांना झटका! डोनबासवर १० वेळा हल्ला केला झाला, पण प्रत्येकवेळी फसगतच झाली; मारियांकामध्येही अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:03 PM2022-04-20T16:03:04+5:302022-04-20T16:03:53+5:30

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपलं लक्ष आता डोनबासवर कब्जा करण्याकडे वळवलं आहे. डोनबासवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियन सैन्य जंग जंग पछाडत आहे.

russia ukraine war vladimir putin volodymyr zelensky dobas donetsk conflict updates | पुतीन यांना झटका! डोनबासवर १० वेळा हल्ला केला झाला, पण प्रत्येकवेळी फसगतच झाली; मारियांकामध्येही अपयश

पुतीन यांना झटका! डोनबासवर १० वेळा हल्ला केला झाला, पण प्रत्येकवेळी फसगतच झाली; मारियांकामध्येही अपयश

googlenewsNext

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपलं लक्ष आता डोनबासवर कब्जा करण्याकडे वळवलं आहे. डोनबासवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियन सैन्य जंग जंग पछाडत आहे. डोनबास युक्रेनच्या पूर्व भागात आहे आणि पश्चिम युक्रेनच्या तुलनेत या ठिकाणी रशियन समर्थक लोकसंख्या अधिक मानली जाते. युरोपियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार डोनबासमध्ये रशियाच्या समर्थनार्थ आधीपासूनच १० ते २० हजार सैनिक तैनात आहेत. तरीही रशियन सैन्याला डोनबासवर पूर्णपणे कब्जा करता आलेला नाही. रशियाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

युक्रेन विरुद्धच्या युद्धाचे ३५ दिवस पूर्ण झाले आहेत. युक्रेन विरुद्धच्या युद्धाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून रशियन सैन्य आता डोनबासला पूर्णपणे स्वतंत्र करण्याकडे लक्ष देणार आहे, असं रशियन सैन्यातील अधिकारी सर्गेई रत्स्कॉय यांनी सांगितलं. दरम्यान, तज्ज्ञांनी हे रशियन सैन्याचं अपयश असल्याचं म्हटलं होतं. इतक्या दिवसांच्या तीव्र युद्धानंतरही कीव्ह ताब्यात न घेतल्यानं रशिया आता डोनबासकडे लक्ष देत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

युक्रेनमध्ये रशियाचे ६२ हजार सैनिक तैनात
एका अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार रशियानं गेल्या २४ तासांत आपल्या सैन्यात आणखी दोन तुकड्या सामील केल्या आहेत. यानंतर युक्रेनमधील रशियन सैन्याच्या तुकड्यांचा आकडा आता ७८ वर पोहोचला आहे. एका तुकडीमध्ये ७०० ते ८०० सैनिक आहेत. म्हणजेच युक्रेनमध्ये ५५ ते ६२ हजार रशियन सैनिक सध्या तैनात आहेत. हे सर्व सैनिक युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्व भागात आहेत. गेल्या आठवड्यात युक्रेनमध्ये रशियाच्या एकूण ६५ तुकड्या होत्या. 

डोनबासमध्ये रशियन समर्थक परदेशी लढाऊ सैनिक देखील उपस्थित आहेत. युरोपियन अधिकाऱ्यानं एका न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार डोनबासमध्ये सध्या १० ते २० हजार परदेशी लढाऊ सैनिक आहेत. हे सैनिक सीरिया आणि लिबियाचे आहेत. पण इतकं सारं सैन्य असूनही रशियाला डोनबासवर अद्याप पूर्णपणे कब्जा करता आलेला नाही. अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. डोनबासच्या डोनेत्स्कला लागून असलेल्या मारियांका शहरातूनही रशियन सैन्याला पळवून लावल्याचा दावा युक्रेननं केला आहे. मार्चमध्ये मारियांकावर रशिय सैन्यानं कब्जा केला होता. युक्रेनच्या दाव्यानुसार गेल्या २४ तासांत रशियाकडून डोनबासवर नियंत्रण मिळवण्यासाठी १० मोठे हल्ले करण्यात आले. पण यात एकदाही यश रशियाला आलेलं नाही. युक्रेनच्या सैन्यानं डोनबासमध्ये रशियन सैन्याचे १२ टँक, एक आर्टिलरी सिस्टम, २८ युद्ध वाहन, एक एसयू-३४ एअरक्राफ्ट, एक Ka-52 हेलिकॉप्टर, ४ ड्रोन आणि एक क्रूझ मिसाइल उद्ध्वस्त केले आहेत. 

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारपासून डोनबासमधील लढाई तीव्र झाली आहे. मंगळवारी, रशियन सैन्यानं डोनबासवर जोरदार बॉम्बफेक केली. २४ तासांत युक्रेनमध्ये १२६० तोफखाना आणि १२१४ लष्करी तळांवर हल्ले करण्यात आल्याचा दावा रशियानं केला आहे. याशिवाय लढाऊ विमानं ठेवलेल्या अशा ६० लष्करी केंद्रांवरही बॉम्बचा वर्षाव करण्यात आला आहे.

Web Title: russia ukraine war vladimir putin volodymyr zelensky dobas donetsk conflict updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.