युक्रेन युद्धात गंगाजळी आटली! पुतीन यांनी उद्योजकांकडे मागितला पैसा, 'चेक' लिहायला घेण्यास सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:33 IST2026-03-27T16:32:42+5:302026-03-27T16:33:27+5:30
Russia Ukraine war cost 2026: युक्रेन युद्धामुळे रशियाची तिजोरी रिकामी. व्लादिमीर पुतिन यांनी उद्योगपतींना दिले युद्धासाठी पैसे देण्याचे आदेश. तर क्रेमलिनने दावा फेटाळला.

युक्रेन युद्धात गंगाजळी आटली! पुतीन यांनी उद्योजकांकडे मागितला पैसा, 'चेक' लिहायला घेण्यास सांगितले...
गेल्या चार वर्षांपासून युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धामुळेरशियाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. एकीकडे मध्यपूर्वेतील युद्धामुळे जगात इंधन संकट निर्माण झाले असताना, दुसरीकडे रशियाची स्वतःची तिजोरी आता रिकामी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील बड्या उद्योगपतींची तातडीची बैठक बोलावून त्यांना युद्धाच्या खर्चासाठी पैसे देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, असा दावा करण्यात येत आहे.
यानुसार पुतिन यांनी कबूल केले आहे की, ''युक्रेनमधील लष्करी कारवाईसाठी रशियाच्या बजेटमधील मोठा हिस्सा खर्च होत आहे. यामुळे देशांतर्गत विकासकामांवर परिणाम होत असून तिजोरीवर मोठा बोजा पडला आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही देशासाठी तुमचे चेक लिहायला सुरुवात करावी." युद्धासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी उद्योगपतींनी त्यांच्या नफ्यातील मोठा हिस्सा सरकारी तिजोरीत जमा करावा, असे त्यांनी सुचवले आहे.
पुतिन यांची मजबुरी
चार वर्षांच्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेले आर्थिक निर्बंध आणि युद्धाचा दररोजचा खर्च यामुळे रशियाला आता अंतर्गत मदतीशिवाय पर्याय उरलेला नाही. रशियाचा खजिना संपल्यास याचा परिणाम जागतिक शस्त्रास्त्र बाजार आणि इंधन पुरवठ्यावरही होऊ शकतो. रशिया सध्या इराण-अमेरिका युद्धात इराणला पाठिंबा देण्याच्या स्थितीत असला, तरी स्वतःची आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने पुतिन यांची चिंता वाढल्याचा दावा वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.
क्रेमलिनचे स्पष्टीकरण
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशातील बड्या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना युद्धाच्या खर्चासाठी 'चेक' लिहिण्याचे आदेश दिले, अशा चर्चांना क्रेमलिनने पूर्णविराम दिला आहे. रशियाच्या अधिकृत प्रवक्त्याने स्पष्ट केले की, अशा प्रकारची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. पुतिन आणि रशियन व्यावसायिक नेत्यांच्या भेटीचा उद्देश देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि पाश्चात्य निर्बंधांना तोंड देणे हा होता, असे क्रेमलिनने म्हटले आहे. युद्धासाठी वैयक्तिक निधी मागितल्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रशियन अधिकाऱ्यांच्या मते, रशियाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे हे दाखवण्यासाठी पाश्चात्य माध्यमांकडून अशा प्रकारच्या 'खोट्या बातम्या' पसरवल्या जात आहेत.