लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:27 IST2025-07-03T13:26:32+5:302025-07-03T13:27:21+5:30

Russia-Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष लवकरच थांबण्याची शक्यता आहे.

Russia-Ukraine: The war between Russia and Ukraine will end soon; Putin's government gave a hint, said... | लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले...

लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले...

Russia-Ukraine:रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष लवकरच थांबण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी शांततेच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली असून, चर्चेच्या दोन फेऱ्या जवळजवळ यशस्वी झाल्या आहेत. आता चर्चेच्या तिसऱ्या फेरीची तारीख लवकरच निश्चित केली जाऊ शकते. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, यावर लवकरच एक करार होईल. 

पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले की, अद्याप कोणतीही निश्चित तारीख ठरलेली नाही, ही प्रक्रिया परस्पर संमतीवर आधारित आहे. त्यांच्या मते पुढील संवाद प्रक्रियेची गती युक्रेन आणि अमेरिकेच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील पहिल्या बैठकीत कैद्यांच्या देवाणघेवाणीवर एक करार झाला, तर दुसऱ्या बैठकीत ६००० युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह परत करणे, आजारी आणि २५ वर्षांखालील कैद्यांची देवाणघेवाण यावर एक करार झाला.

दोन्ही देशांमधील चर्चेची पहिली फेरी १६ मे रोजी इस्तंबूलमध्ये झाली, तर दुसरी फेरी २ जून रोजी तुर्कीमध्ये झाली. शेवटच्या बैठकीत युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव्ह यांनी तिसरी बैठक जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु अद्याप तारीख ठरलेली नाही.

२ जून रोजी झालेल्या करारानंतर रशियन माध्यमांनी वृत्त दिले होते की, रशियाने युद्धविरामासाठी दोन प्रस्ताव दिले होते, ज्यामध्ये रशिया आपला भाग मानणाऱ्या चार प्रदेशांमधून (डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझ्झिया) युक्रेनियन सैन्याची माघारीची मागणी होती. याशिवाय, युक्रेनमध्ये १०० दिवसांच्या आत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका घेण्याची अट ठेवण्यात आली होती. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की या मागण्या शांततेच्या उद्देशाच्या विरुद्ध असल्याचे म्हणत आहेत. या मागण्या युक्रेनच्या आत्मसमर्पणाच्या अटी आहेत, ज्या ते स्वीकारणार नाहीत.

झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रेई येरमाक यांनी जोर देऊन सांगितले की, रशिया युद्धविराम रोखण्यासाठी आणि युद्ध सुरू ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनमधील युद्धाचा उपाय म्हणजे संघर्षाचे मूळ कारण नष्ट करणे, असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की रशिया लढाई थांबवण्यास तयार आहे. दुसरीकडे, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी आश्वासन दिले की, ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कात आहेत आणि दोघेही चर्चेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. आता शेवटी काय निर्णय घेतला जाईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Web Title: Russia-Ukraine: The war between Russia and Ukraine will end soon; Putin's government gave a hint, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.