“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:39 IST2025-10-02T18:38:27+5:302025-10-02T18:39:19+5:30
Congress Rahul Gandhi Tour Colombia: BJP-RSSची विचारसरणी कमकुवत लोकांवर अधिकार गाजवणे आणि त्यांच्यापेक्षा जे बलवान आहेत, अशा लोकांपासून पळून जाणे आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.

“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
Congress Rahul Gandhi Tour Colombia: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या विचारसरणीतील भ्याडपणा हेच मूळ आहे, अशी टीका काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींनीकोलंबियातून भारत सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले की, भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. राहुल गांधी यांनी भारताच्या रचनात्मक त्रुटी या मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि देशाच्या विविध परंपरांना भरभराटीला येऊ दिले पाहिजे, असे सुचवले.
सन २०२३ मध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनबाबत केलेल्या विधानाचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, आरएसएसची विचारसरणी कमकुवत लोकांवर अधिकार गाजवणे आणि त्यांच्यापेक्षा जे बलवान आहे, अशा लोकांपासून पळून जाणे, अशी आहे. भाजप-आरएसएसचा स्वभावच असा आहे. जर परराष्ट्रमंत्र्यांचे विधान नीट लक्षात आले तर ते म्हणाले होते की, चीन आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. मी त्यांच्याशी कसा लढू शकतो? या अशा विचारसरणीच्या मुळाशी भ्याडपणा आहे, या शब्दांत राहुल गांधी हल्लाबोल केला.
वीर सावरकरांच्या पुस्तकाचा आधार घेत केली टीका
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुस्तकातील एका घटनेचा उल्लेख करत टीका केली. त्यांच्या पुस्तकात सावरकरांनी लिहिले आहे की, एकदा त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी एका मुस्लीम माणसाला मारहाण केली आणि त्या दिवशी त्यांना खूप आनंद झाला. जर पाच जणांनी एकाच व्यक्तीला मारहाण केली, ज्यामुळे त्यापैकी एकाला आनंद झाला, तर ते भ्याडपणा आहे. ही आरएसएसची विचारसरणी आहे, कमकुवत लोकांना मारहाण करणे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारताकडे अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात मजबूत क्षमता आहेत, म्हणून मी देशाबाबत आशावादी आहे. परंतु त्याच वेळी, रचनेत काही त्रुटी आहेत ज्या भारताला दुरुस्त कराव्या लागतील. सर्वांत मोठे आव्हान म्हणजे भारतात होत असलेला लोकशाहीवरील हल्ला. लोकशाही व्यवस्था विविधतेसाठी महत्त्वाची आहे. परंतु, भारतातील लोकशाही व्यवस्थेवर होत असलेला हल्ला मोठा धोका ठरत आहे, असा दावा राहुल गांधींनी केला.