'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:15 IST2025-07-03T17:14:22+5:302025-07-03T17:15:27+5:30

PM Narendra Modi Ghana Visit: PM नरेंद्र मोदी सध्या घाना देशाच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी येथील संसदेला संबोधित केले.

PM Narendra Modi Ghana Visit: 'We have 2500 political parties in country', all the leaders in Ghana were shocked to hear the number | 'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले

'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले

PM Narendra Modi Ghana Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या घाना देशाच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या तीन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच घाना दौरा आहे. या दौऱ्यात पीएम मोदींना घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, आज(दि.३) घानाच्या संसदेला संबोधित करताना दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा उल्लेख केला. आपली मैत्री घानाच्या प्रसिद्ध लोफ अनानासपेक्षाही गोड असल्याचे मोदी म्हणाले.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज या प्रतिष्ठित सभागृहाला संबोधित करताना मला खूप अभिमान वाटतोय. घानामध्ये येणे माझ्यासाठी भाग्याचे आहे. ही अशी भूमी आहे, जी लोकशाहीच्या भावनेने ओतप्रोत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रतिनिधी म्हणून, मी माझ्यासोबत १.४ अब्ज भारतीयांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा घेऊन येथे आलोय. घानाकडून मिळालेल्या सर्वोच्च सन्मानाबद्दल मी १४० कोटी भारतीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो.

केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार

जेव्हा आपण घानाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला एक असे राष्ट्र दिसते, जे धैर्याने उभे आहे, जे प्रत्येक आव्हानाला सन्मानाने तोंड देते आहे. समावेशक प्रगतीसाठी तुमच्या वचनबद्धतेमुळे घाना संपूर्ण आफ्रिकन खंडासाठी प्रेरणास्थान बनले आहे. मित्रांनो, काल संध्याकाळचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भावनिक होता. तुमचा राष्ट्रीय सन्मान मिळणे, माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

भारतात २५०० राजकीय पक्ष; घानातील नेते झाले अवाक्...
यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या लोकशाहीचे कौतुक करताना सांगितले की, भारतात २५०० राजकीय पक्ष आहेत, त्यापैकी १७ ते १८ पक्ष कुठल्या ना कुठल्या राज्यात सत्तेवर आहेत. हा आकडा ऐकून घानाच्या संसदेत उपस्थित असलेले सर्व नेते आश्चर्यचकित झाले अन् ते एकमेकांकडे पाहू लागले. यादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आहे. आमच्यासाठी लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, ती मूलभूत मूल्यांचा एक भाग आहे. भारतात २२ अधिकृत भाषा आहेत, हजारो बोलीभाषा आहेत. यामुळेच भारतात येणाऱ्या लोकांचे नेहमीच खुल्या मनाने स्वागत केले जाते.

भारताचे घानासोबत ५ सामंजस्य करार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्या उपस्थितीत भारत आणि घानाने चार सामंजस्य करार केले.

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमावर सामंजस्य करार: कला, संगीत, नृत्य, साहित्य आणि वारसा यामध्ये अधिक सांस्कृतिक समज आणि देवाणघेवाण वाढवण्याचे उद्दिष्ट.

भारतीय मानक ब्युरो आणि घाना मानक प्राधिकरण यांच्यातील सामंजस्य करार: मानकीकरण, प्रमाणन आणि अनुरुपता मूल्यांकनात सहकार्य वाढवणे हे उद्दिष्ट आहे.

घानाच्या पारंपारिक आणि पर्यायी औषध संस्था आणि भारतीय आयुर्वेदातील शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्यातील सामंजस्य करार: पारंपारिक औषध शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनात सहकार्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

संयुक्त आयोगाच्या बैठकीवरील सामंजस्य करार: उच्च-स्तरीय संवाद संस्थात्मक करणे आणि नियमितपणे द्विपक्षीय सहकार्य यंत्रणांचा आढावा घेणे हे उद्दिष्ट आहे.

Web Title: PM Narendra Modi Ghana Visit: 'We have 2500 political parties in country', all the leaders in Ghana were shocked to hear the number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.