पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:15 IST2025-10-08T10:09:18+5:302025-10-08T10:15:29+5:30
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण अवलंबत आहे. विशेषतः आर्थिक क्षेत्रात भारताची कामगिरी प्रशन्सनीय आहे. सर्वाधिक विकास दरासह भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे."

पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
भारत आणि रशियाची भागीदारी तथा मैत्री केवळ तोंडापुरतीच नव्हे, तर काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि परस्पर विश्वासावर आधारलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त फोनकरून दिलेल्या शुभेच्छाही याचेच प्रतिक आहे.
मंगळवारी (७ ऑक्टोबर) रोजी पुतिन यांचा ७३ वा वाढदिवस होता. यानिमित्र पंतप्रधान मोदी यांनी त्यांना फोन करून उत्तम आरोग्यासाठी आणि यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केवळ औपचारिकच नव्हे, तर भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्याच्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या रणनीतिक भागीदारीला प्राधान्य देण्यावरही चर्चा झाली.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यास उत्सुक -
रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियाच्या रणनीतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासंदर्भात चर्चा केली. याच बरोबर, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुतिन यांच्या भारत दौऱ्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. दरम्यान, "डिसेंबरमध्ये होणाऱ्या २३ व्या भारत-रशिया शिखर संमेलनात आपण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यास अत्यंत उत्सुक आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
...भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण अवलंबत आहे : पुतिन -
यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण अवलंबत आहे. विशेषतः आर्थिक क्षेत्रात भारताची कामगिरी प्रशन्सनीय आहे. सर्वाधिक विकास दरासह भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे."