बांगलादेशमध्ये BNP च्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा तारिक रहमान यांना फोन; दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:19 IST2026-02-13T17:08:08+5:302026-02-13T17:19:04+5:30
बांगलादेशातील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्यात फोनवर संवाद झाला.

बांगलादेशमध्ये BNP च्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा तारिक रहमान यांना फोन; दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?
PM Modi on Bangladesh Election Results: बांगलादेशात झालेल्या १३ व्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने दोन-तृतीयांश बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. या मोठ्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर झालेल्या या पहिल्याच मोठ्या निवडणुकीतील विजयाला दक्षिण आशियाई राजकारणातील एक महत्त्वाचे वळण मानले जात आहे.
पंतप्रधान मोदींचे सोशल मीडियावरून खास मेसेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. "मिस्टर तारिक रहमान यांच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. बांगलादेशातील जनतेने दिलेल्या या कौलाचे आम्ही स्वागत करतो. दोन जवळचे शेजारी म्हणून भारत आणि बांगलादेशचे ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध अत्यंत दृढ आहेत. बांगलादेशातील जनतेची प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी भारत सदैव कटिबद्ध राहील," असं पंतप्रधान मोदींनी म्हटले. विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी रहमान यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
बीएनपी कडून भारताचे आभार
पंतप्रधान मोदींच्या या पुढाकाराचे बांगलादेश नॅशनल पार्टीने स्वागत केले आहे. बीएनपीच्या स्थायी समितीचे सदस्य नजरुल इस्लाम खान यांनी मोदींचे आभार मानताना, "लोकशाही देशाने जनतेच्या निकालाचा सन्मान करणे ही आनंदाची बाब आहे. पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांना दिलेले अभिनंदन आणि या जनादेशाला दिलेली मान्यता कौतुकास्पद आहे. यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, असा आम्हाला विश्वास आहे," असं म्हटलं.
१७ वर्षांनंतर बीएनपीची सत्तावापसी
सुमारे १७ वर्षांनंतर बांगलादेश नॅशनल पार्टीने सत्तेत जोरदार पुनरागमन केले आहे. ३०० जागांच्या संसदेत बीएनपी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी २१० हून अधिक जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला. मायदेशी परतलेले तारिक रहमान दोन मतदारसंघातून निवडून आले आहेत. या निवडणुकीत जमात-ए-इस्लामी हा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे.
चीन आणि पाकिस्तानचीही भूमिका
बांगलादेशातील या सत्तापालटाची दखल जागतिक स्तरावरही घेतली जात आहे. चीनने म्हटले आहे की, ते बांगलादेशच्या देशांतर्गत अजेंड्याला पाठिंबा देतात आणि स्ट्रॅटेजिक को-ऑपरेटिव्ह पार्टनरशिप पुढे नेण्यासाठी ढाकासोबत काम करण्यास तयार आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही तारिक रहमान यांचे अभिनंदन केले असून व्यापार, संरक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.