इराण युद्धापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा 'मोठा गेम'? डिफेन्स फंडमध्ये कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा प्रयत्न; पेंटागॉनने आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:34 IST2026-03-31T11:33:11+5:302026-03-31T11:34:24+5:30
Pete Hegseth Defence Fund News Marathi: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर इराण युद्धाच्या काही दिवस आधी डिफेन्स फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा आरोप झाला आहे. पेंटागॉनने हे आरोप फेटाळले आहेत.

इराण युद्धापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा 'मोठा गेम'? डिफेन्स फंडमध्ये कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा प्रयत्न; पेंटागॉनने आरोप फेटाळले
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नसतानाच, अमेरिकन राजकारणात एक खळबळजनक खुलासा झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या ब्रोकरने इराणवर हल्ला होण्यापूर्वी संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. मात्र, पेंटागॉनने तातडीने निवेदन प्रसिद्ध करून हे सर्व आरोप 'खोटे आणि मनघडंत' असल्याचे म्हटले आहे.
'फायनान्शिअल टाइम्स'च्या अहवालानुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये—म्हणजेच अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी—हेगसेथ यांच्या मॉर्गन स्टॅन्लेमधील ब्रोकरने ब्लॅकरॉक या कंपनीशी संपर्क साधला होता. या संपर्काचा उद्देश 'डिफेन्स इंडस्ट्रियल ॲक्टिव्ह ईटीएफ'मध्ये अनेक दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणे हा होता. युद्धाच्या काळात संरक्षण कंपन्यांचे शेअर्स वाढतात, याचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही गुंतवणूक 'डिफेन्स इंडस्ट्रियल ॲक्टिव्ह ईटीएफ' मध्ये केली जाणार होती, ज्यामध्ये लॉकहीड मार्टिन आणि नॉर्थ्रोप ग्रुमन यांसारख्या प्रमुख अमेरिकन संरक्षण कंपन्यांचा समावेश आहे.
प्लॅनिंग का यशस्वी झाले नाही?
हा गुंतवणुकीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, कारण ज्या फंडमध्ये गुंतवणूक करायची होती, तो अद्याप मॉर्गन स्टॅन्लेच्या ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध झाला नव्हता. महत्त्वाचे म्हणजे, या व्यवहाराबद्दल खुद्द संरक्षण मंत्री हेगसेथ यांना माहिती होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्लॅकरॉक आणि मॉर्गन स्टॅन्ले या दोन्ही कंपन्यांनी या विषयावर अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला आहे.
पेंटागॉनची आक्रमक भूमिका
पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी या अहवालाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "ही कथा पूर्णपणे खोटी आहे. संरक्षण मंत्री हेगसेथ किंवा त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीने अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी कोणाशीही संपर्क साधलेला नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
माहिती लीक झाल्याचा संशय?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांपूर्वी शेअर बाजारात होणाऱ्या मोठ्या व्यवहारांची सध्या अमेरिकेत व्यापक चौकशी सुरू आहे. काही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, सरकारचे गुपित निर्णय अंमलबजावणीपूर्वीच काही विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? या पार्श्वभूमीवर हेगसेथ यांच्यावर झालेले आरोप अत्यंत गंभीर मानले जात आहेत.
ट्रम्प यांचा 'हा' दावा चर्चेत
विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच एका भाषणात असे म्हटले होते की, इराणवर लष्करी कारवाई करण्याबाबत सल्ला देणारे हेगसेथ हे पहिले वरिष्ठ अधिकारी होते. "चला हे करून टाकूया, आपण त्यांना अण्वस्त्रे बनवू देऊ शकत नाही," असे हेगसेथ यांनी म्हटल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. या विधानामुळे आता या गुंतवणुकीच्या आरोपांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.