पैसे द्या अन् माफी मिळवा! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पार्डन बाजार' सुरू? दररोज सुटतायत ६ गुन्हेगार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 18:39 IST2026-02-16T18:38:14+5:302026-02-16T18:39:37+5:30
गेल्या एका वर्षात ट्रम्प यांनी तब्बल १८०० हून अधिक गुन्हेगारांची शिक्षा माफ केली आहे, म्हणजेच सरासरी दररोज ६ गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येत आहेत.

पैसे द्या अन् माफी मिळवा! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पार्डन बाजार' सुरू? दररोज सुटतायत ६ गुन्हेगार!
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकारांचा असा काही वापर सुरू केला आहे की, संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिकेच्या संविधानाने दिलेला 'क्षमादानाचा अधिकार' आता केवळ गरिबांसाठी किंवा अन्यायाविरुद्ध नसून, तो केवळ 'श्रीमंत आणि हितचिंतकांसाठी' मर्यादित राहिल्याची टीका होत आहे. गेल्या एका वर्षात ट्रम्प यांनी तब्बल १८०० हून अधिक गुन्हेगारांची शिक्षा माफ केली आहे, म्हणजेच सरासरी दररोज ६ गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येत आहेत.
पैसा आणि सत्तेचे गणित?
इतर राष्ट्रपतींनी जिथे सामान्य कैद्यांच्या अर्जांचा विचार केला, तिथे ट्रम्प यांच्या काळात मात्र चित्र वेगळे दिसत आहे. इराण आणि अमेरिकेतील अल-जजीराच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासनाने अशाच लोकांना माफी दिली आहे जे प्रचंड श्रीमंत आहेत किंवा ज्यांनी ट्रम्प यांच्या राजकीय मोहिमेला मोठी मदत केली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीचे अब्जाधीश, वादात सापडलेले रिअॅलिटी टीव्ही स्टार्स आणि त्यांचे 'MAGA' समर्थक यांचा समावेश आहे.
भ्रष्ट बँकरची 'डील': जानेवारी २०२६ मध्ये ट्रम्प यांनी एका भ्रष्ट बँकरला माफी दिली. विशेष म्हणजे, या माफीनंतर अवघ्या काही दिवसांतच त्या बँकरच्या मुलीने ट्रम्प समर्थक 'सुपर पीएसी'ला लाखो डॉलर्सची देणगी दिली.
क्रिप्टो किंगची सुटका: ऑक्टोबर २०२५ मध्ये 'बायनान्स' या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचा संस्थापक चांगपेंग झाओ याला मनी लाँड्रिंगच्या आरोपातून माफी देण्यात आली.
जेफरी एपस्टीन कनेक्शन: आता कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनची जुनी मैत्रीण ग्लेन मेक्सेवेल हिनेही माफीची मागणी केली आहे. जुन्या मैत्रीमुळे ट्रम्प तिलाही लवकरच मुक्त करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
क्षमादानासाठी स्पेशल टीम
ही प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या 'चीफ ऑफ स्टाफ'च्या हाताखाली एक विशेष पथक तयार केले आहे. हे पथक अर्जांची छाननी करते आणि त्यांच्या शिफारसीवर ट्रम्प स्वाक्षरी करतात. अमेरिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या वेगाने गुन्हेगारांना माफी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टीकेचा रोख
माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाता-जाता आपल्या कुटुंबातील काही लोकांसाठी क्षमादान जाहीर केले होते, तेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र, आता स्वतः ट्रम्प यांनी पैशाच्या जोरावर सुटका असा पायंडा पाडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.