मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 08:56 IST2025-08-21T08:55:42+5:302025-08-21T08:56:31+5:30

एका पॅलेस्टिनी तरुणीने या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Palestine Nadine Ayoub will participate in this year's 'Miss Universe' competition | मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...

मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातला संघर्ष सध्या टोकाला पोचलेला आहे. गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये दररोज मरणाऱ्या असंख्य माणसांच्या, अन्नाशिवाय तडफडत असलेल्या कुपोषणग्रस्त लहान मुलांच्या अस्वस्थ करणाऱ्या कितीतरी बातम्या रोज येऊन धडकत असताना एक वेगळी बातमी समोर आली आहे. नादीन अय्यूब ही पॅलेस्टाइनची तरुणी यंदा मिस युनिव्हर्स या स्पर्धेत सहभागी होणार आहे. एका पॅलेस्टिनी तरुणीने या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावर इतिहासात पहिल्यांदाच पॅलेस्टाइनचं प्रतिनिधित्व करायला मिळणार या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, अशी भावना नादीन हिने यानिमित्ताने व्यक्त केली आहे.   

‘गाझा पट्टीत, त्यातही पॅलेस्टाइनमध्ये सध्या काय सुरू आहे हे संपूर्ण जग पाहत आहे. अशा परिस्थितीत मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावर स्पर्धक म्हणून सहभागी होत असताना मी एका सत्याचा आवाज म्हणूनही हे प्रतिनिधित्व करत आहे. ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय त्या माझ्या मायभूमीतल्या सगळ्या नागरिकांची मी प्रतिनिधी आहे. आम्ही म्हणजे फक्त आमच्या वेदना नाहीत, आम्ही आशा, चिकाटी आणि आमच्या मायभूमीवरच्या आमच्या प्रेमाचं प्रतीक घेऊन जगत आहोत’, अशी भावना नादीन आपल्या मनोगतात व्यक्त करते. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नादीनचं मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावरून बोलणं ही एक मोठी गोष्ट म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. 

‘तुमच्याकडे पॉवर असते तेव्हा तुम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवणं हे तुमचं कर्तव्य असतं. मिस युनिव्हर्स हे एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. गाझा पट्टीत जे घडतं आहे त्याबद्दल या व्यासपीठावरून बोलणं ही माझी जबाबदारी आहे. अन्यायाविरोधात कुणीच शांत बसू नये, आत्ता शक्य त्या सर्व ठिकाणी पॅलेस्टाइनला सहभागी करून घेणं आवश्यक आहे,’ अशी भावनाही नादीन बोलून दाखवते.     

नादीनने २०२२ मध्ये मिस पॅलेस्टाइनचा किताब जिंकला. वयाच्या २७ व्या वर्षी तिने मिस अर्थ स्पर्धेत सहभाग घेतला आणि पाच फायनलिस्ट्समध्येही तिचा समावेश झाला. त्यानंतर ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत उतरणार हे निश्चित होतं. पण गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर ते शक्य झालं नाही. तिने साहित्य आणि मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. वेलनेस आणि न्यूट्रिशन कोच म्हणूनही तिने व्यावसायिक शिक्षण घेतलं आहे. शिक्षिका आई आणि वकील वडिलांच्या निमित्ताने तिने अमेरिका आणि कॅनडामध्ये वास्तव्य केलं आहे. सध्या रामल्ला, अम्मान आणि दुबई अशा तीन ठिकाणी तिचं वास्तव्य असतं. ऑलिव्ह ग्रीन अकादमीच्या माध्यमातून ती शाश्वत विकासाबाबत जनजागृतीचं काम करते. 

मिस युनिव्हर्स स्पर्धा थायलंडमधल्या पार्क क्रेट शहरात नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रवास ही अडथळ्यांची शर्यत आहे.  ‘एक पॅलेस्टिनी प्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरते आहे, स्पर्धक म्हणून पात्र ठरण्यासाठी अनेक अटी आहेत, त्यामुळेच मला इथपर्यंत पोहोचायला अनेक वर्षे लागली,’ असं नादीन सांगते. ‘इतर देशांतल्या स्पर्धकांकडे असतात तशी साधनं आणि संधीही माझ्या देशात नाहीत. कारण पॅलेस्टाइनचे प्राधान्यक्रम आणि त्याच्यासमोरची आव्हानं वेगळी आहेत, तरी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करून या व्यासपीठावर माझ्या देशाचा आवाज होणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे,’ अशी तिची भावना आहे.

Web Title: Palestine Nadine Ayoub will participate in this year's 'Miss Universe' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.