पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:49 IST2025-05-11T13:48:41+5:302025-05-11T13:49:17+5:30
खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले.

पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तान यांच्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर आणि तणावानंतर, शनिवार, १० मे रोजी युद्धविरामावर सहमती झाली. मात्र यानंतर, पाकिस्तानने अवघ्या ४ तासांतच सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले. त्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दोन्ही देशांतील युद्धविरामाची घोषणा केली होती.
"अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान यांनी तत्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. या समजदारीबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन! असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून म्हटले होते. यानंतर भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली. मात्र, याच रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन दिसल्याचे आणि स्फोट झाल्याचे वृत्त आले. यानंतर, भारतीय लष्कराने हवाई संरक्षण प्रणालींचा वापर करून प्रत्युत्तर दिले आणि रात्री ११ वाजता विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाची माहिती दिली. तसेच भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही सांगितले.
पुन्हा ब्लॅक आउट -
खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले. पंजाबातील ज्या जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला, त्यांत होशियारपूर, फिरोजपूर, फाजिल्का, पठाणकोट, पटियाला, मोगा, कपूरथला, मुक्तसर यांचा समावेश होता. गुजरातमधील कच्छ, जामनगर, पाटण, संतालपूर आणि बनासकांठा येथे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर राजस्थानातील जोधपूर आणि जैसलमेर येथे वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तणाव आणि संघर्ष
शनिवारी संध्याकाळी नागरोटा लष्करी तळाजवळ एका संशयिताशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला. व्हाईट नाईट कॉर्प्सने या चकमकीची पुष्टी केली आहे. ड्रोन हल्ले आणि स्फोटांमुळे खोऱ्यात तणाव कायम आहे.
पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा -
या घडामोडींदरम्यान, आपण युद्धविरामाचे प्रामाणिकपणे पालन करण्यास वचनबद्ध आहेत, असे पाकिस्तानने म्हटले होते. याच वेळी पाकिस्तान ने भारतावरच युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही जबाबदारीने आणि संयमाने परिस्थिती हाताळत आहोत, भारतच काही भागात उल्लंघन करत आहे.