'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:51 IST2026-01-07T18:51:16+5:302026-01-07T18:51:51+5:30
यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अॅक्ट (FARA) अंतर्गत नवीन खुलासे उघड झालेत

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
नवी दिल्ली - मागील वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी तळांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूरभारताने हाती घेत दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला होता. त्यात भारतासोबत युद्ध रोखण्यासाठी पाकिस्ताननं भीतीपोटी अमेरिकेकडे तब्बल ६० वेळा युद्ध रोखण्यासाठी विनवणी केली. पाकिस्तानने यासाठी लॉबिंगही केली होती. जवळपास ४५ कोटी पाकिस्तानने खर्च केले होते. अमेरिकन सरकारद्वारे अनेक दस्तावेज सार्वजनिक केल्यानंतर हा खुलासा झाला आहे.
यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अॅक्ट (FARA) अंतर्गत नवीन खुलासे उघड झालेत. त्यातून समोर आलंय की, ऑपरेशन सिंदूर फक्त थांबवले आहे परंतु पाकिस्तानी भूभागावरील हल्ले पुन्हा सुरू होऊ शकतात याची चिंता इस्लामाबादला होती. पाकिस्तान अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ व्यक्तींशी सतत संपर्कात होता आणि युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत होता. या काळात पाकिस्तान अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदतीची विनंती करत होता असंही अमेरिकन कागदपत्रांच्या अहवालातून उघड झाले.
पाकिस्तानचा खोटा दावाही उघडकीस
FARA दस्तऐवजाने पाकिस्तानचा खोटा दावाही उघड झाला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरवेळी युद्धबंदीची मागणी केली होती. खरं तर, लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती आणि विनवणी पाकिस्तानी कमांडर्सकडून आली होती. प्रत्यक्षात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा अंदाज आला होता आणि भारताच्या लष्करी सामर्थ्यासमोर ते आणखी नुकसान सहन करण्यास असमर्थ होते. म्हणूनच शेवटचा उपाय म्हणून इस्लामाबादने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मदत मागितली. हल्ले पुन्हा सुरू होण्याची भीती पाकिस्तानच्या मनात होती.
'ऑपरेशन सिंदूर' ही भारतीय लष्कराची मोठी कारवाई
'ऑपरेशन सिंदूर' हे २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यात राबवण्यात आले. ही एक मोठी भारतीय लष्करी कारवाई होती. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप लोकांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानी हद्दीत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला होता. त्यानंतर १० मे रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली.