अफगाणिस्तानच्या हल्ल्याने पाकिस्तान हादरलं; ख्वाजा आसिफ यांचा भारताचा उल्लेख करत थेट इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:32 IST2026-02-27T11:31:04+5:302026-02-27T11:32:45+5:30
पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता अफगाणिस्तानला खुल्या युद्धाचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, या वादात त्यांनी भारताचे नाव ओढत तालिबानवर गंभीर आरोप केले आहेत.

अफगाणिस्तानच्या हल्ल्याने पाकिस्तान हादरलं; ख्वाजा आसिफ यांचा भारताचा उल्लेख करत थेट इशारा!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. गुरुवारी उशिरा रात्री अफगाणिस्तानने कुनार प्रांतात केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या मोठ्या जीवितहानीमुळे पाकिस्तान सरकार हादरले असून, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता अफगाणिस्तानला खुल्या युद्धाचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, या वादात त्यांनी भारताचे नाव ओढत तालिबानवर गंभीर आरोप केले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'आमचा संयम संपलाय' - ख्वाजा आसिफ
अफगाणिस्तानकडून खैबर पख्तूनख्वा सीमेवर सतत होणाऱ्या गोळीबारावर ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, "पाकिस्तानचा संयम आता संपला आहे. पाकिस्तानचे सैन्य काही दुसऱ्या खंडातून आलेले नाही. आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि तुमच्या मर्यादा आम्हाला नीट ठाऊक आहेत. आता जे होईल ते समोरासमोर आणि खुले युद्ध असेल."
तालिबानवर भारताचा एजंट असल्याचा आरोप
आपल्या संतापजनक प्रतिक्रियेत ख्वाजा आसिफ यांनी थेट भारताचा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, अफगाण तालिबान हे 'भारत समर्थक' असून ते दहशतवादाचा प्रसार करत आहेत. आसिफ यांच्या मते, नाटो सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने या देशाला भारतीय वसाहत बनवले आहे. तालिबान शासन आता भारताचा प्रतिनिधी म्हणून काम करत असून जगभरातील दहशतवाद्यांना एकत्र करून दहशतवादाची निर्यात करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
दोन्ही बाजूंकडून विजयाचे मोठे दावे
या ताज्या संघर्षानंतर दोन्ही देशांकडून दावे-प्रतिदाव्यांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अफगाण सरकारने म्हटले आहे की, त्यांच्याकडे २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आहेत. तसेच त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे एक मुख्यालय आणि १९ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार, या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाक सैन्याने 'ऑपरेशन गजब लिल हक' सुरू केले आहे. यामध्ये ७२ अफगाण तालिबानी मारले गेल्याचा आणि १२० हून अधिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी भारताचे नाव घेतल्यामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.