Pakistan Reaction on Indus Water Treaty: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानवर मोठे जल संकट ओढवले असून, याविरोधात पाक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सतत ओरड करत आहे. आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले की, भारताचा हा निर्णय खूप धोकादायक आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध असून, पाकिस्तानच्या 24 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आणू शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधी उस्मान जादून म्हणाले की, भारताचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. पाकिस्तानी राजदूताने भारताला नदीचे पाणी थांबवणे किंवा वळवणे यासारख्या गोष्टी करू नयेत असे आवाहन केले. या नद्या करोडो पाकिस्तानी लोकांसाठी जीवनरेखा आहेत. पाकिस्तानने जगाला पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या प्रकरणावर लक्ष घालण्याचे आणि वेळेवर कारवाई करण्याचे आवाहन केले.
पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सिंधू नदीचे पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तान सतत धमक्या देत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या एका विधानात म्हटले होते की, सिंधू आमची आहे. आमचे पाणी किंवा त्यांचे रक्त सिंधूत वाहेल. तर, याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारताचे पाणी फक्त भारतातील लोकांसाठी आणि फक्त भारतातच वाहेल.