पाकिस्तानातही घुमणार ‘जय श्रीराम’चा जयघोष; राम मंदिराचे काम सुरु; २०० वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:10 PM2024-02-27T15:10:56+5:302024-02-27T15:11:20+5:30

Ram Mandir In Pakistan: येत्या सहा महिन्यांत या राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. पाकिस्तानातील हे एकमेवर राम मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.

pakistan one and only ram mandir in islamkot sindh to be built in 6 months and muslims take part in renovate temple building | पाकिस्तानातही घुमणार ‘जय श्रीराम’चा जयघोष; राम मंदिराचे काम सुरु; २०० वर्षांचा इतिहास

पाकिस्तानातही घुमणार ‘जय श्रीराम’चा जयघोष; राम मंदिराचे काम सुरु; २०० वर्षांचा इतिहास

Ram Mandir In Pakistan: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा झाला. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे भव्य हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यातच आता पाकिस्तानमध्येहीराम मंदिर बांधले जात असल्याचे सांगितले जात आहे. हे पाकिस्तानातील एकमेव राम मंदिर असून, पाकिस्तानातील हिंदू समाजासाठी या मंदिराचे अनन्य साधारण असल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील डेरा रहीम यार खान परिसरातील माखन राम जयपाल यांनी या राम मंदिराच्या बांधकामाचा एक व्हिडिओ युट्युबवर शेअर केल्याचे म्हटले जात आहे. माखन राम जयपाल यांच्यानुसार, सिंध प्रांतातील इस्लामकोट येथे २०० वर्ष जुने एक राम मंदिर आहे. आजूबाजूच्या परिसरातील हिंदू समाज बांधव या मंदिरात येऊन नियमितपणे पूजन-भजन करत असतात. 

स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे पाकिस्तानातील एकमेव असे हिंदू मंदिर आहे, जिथे नियमितपणे पूजन केले जाते. या मंदिराचे बांधकाम खूप जुने झाले आहे. यामुळे या मंदिराला लागूनच नवे मंदिर बांधले जात आहे. जुन्या राम मंदिरातील मूर्ती नवीन मंदिरात स्थापन केल्या जाणार आहेत. या मंदिराच्या बांधकामात मुस्लिम समाजातील युवक सहभागी झाले आहेत.

माखन राम जयपाल यांनी सांगितले की, मंदिर बांधण्यात मुस्लिम कामगारांचाही समावेश आहे. येत्या सहा महिन्यांत मंदिराची नवीन इमारत बांधली जाईल, अशी आशा आहे. नवीन इमारतीत पूर्ण विधी करून जुन्या मंदिरातील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जुन्या राम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह महादेवांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

राम मंदिर बांधकामात सहभागी झालेल्या एक मुस्लीम कामगाराने सांगितले की, इस्लामकोटमधील संत नेनुराम आश्रम बांधकामातही सहभाग घेतला होता. पाकिस्तानातील हिंदू समाजात या आश्रमाला खूप प्रतिष्ठा आहे. हा आश्रम सुमारे १० एकर जागेवर पसरलेला आहे. त्यात एक मंदिर आणि एक मोठी विश्रांतीची जागा आहे. पाकिस्तानात स्वातंत्र्यापूर्वी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मंदिरांची देखभाल दुरुस्तीअभावी सध्या दुरवस्था झाली आहे.

 

Web Title: pakistan one and only ram mandir in islamkot sindh to be built in 6 months and muslims take part in renovate temple building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.