संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:11 PM2023-01-31T12:11:10+5:302023-01-31T12:14:04+5:30

pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली.

pakistan economic crisis after petrol price hike mob set fire to the pump in lahore | संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट (Pakistan Economic Crisis) झाली आहे. येथील ढासळत्या आर्थिक परिस्थितीबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. महागाईने होरपळलेली जनता कधी पिठासाठी भांडताना दिसून येते, तर कधी पेट्रोलच्या किमती (Petrol Price in Pakistan) वाढल्यामुळे आक्रोश करताना दिसते. 

दरम्यान, वाढत्या महागाईदरम्यान पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील महागाई आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे सरकार आणि जनता प्रचंड अस्वस्थ आहे. तिजोरी भरण्यासाठी शाहबाज सरकार जनतेवर कराचा बोजा वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 रुपयांनी वाढ केली असून या निर्णयामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जाळपोळ केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल 
एका पाकिस्तानी नागरिकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमावाने पेट्रोल पंप पेटवताना दिसत आहे. या यूजरने सांगितले की, देशात पेट्रोलच्या दरात 35 रुपयांची वाढ झाल्याने लोक संतप्त झाले असून त्यांनी लाहोरमध्ये एका पंपाला आग लावली. या घटनेनंतर पंपातून धुराचे लोट दूरवरून दिसत होते.

वाढत्या महागाईमुळे लोक हैराण 
दरम्यान, पाकिस्तानमधील वाढत्या महागाईमुळे येथील लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल ते पीठाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानातील शहरांमध्ये कांद्याचा भाव प्रतिकिलो 220.4 रुपये, दुधाचा भाव 114.8 रुपये प्रति लिटरवरून 149.7 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पीठ 150 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. तसेच, मोहरीचा भाव पाचशे रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल 249.80 रुपये प्रति लीटर, हाय-स्पीड डिझेल 262.80  रुपये प्रति लिटर, रॉकेल 189.83 रुपये आणि हलके डिझेल 187 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

श्रीलंकेत सुद्धा आर्थिक परिस्थिती होती बिकट 
श्रीलंकेत गेल्यावर्षी महागाई आणि हिंसाचाराने थैमान माजवले होते. आर्थिक संकटात सापडल्यानंतर श्रीलंकेत भीषण स्थिती निर्माण झाली होती. यानंतर हजारो निदर्शकांनी थेट तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीच वाढताना दिसल्यानंतर पुढील धोका लक्षात घेत तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: pakistan economic crisis after petrol price hike mob set fire to the pump in lahore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.