पाकिस्तानचा पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; अनेकजण ठार झाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:09 IST2025-10-15T19:07:48+5:302025-10-15T19:09:15+5:30
Pakistan- Afghanistan Tension: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

पाकिस्तानचा पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; अनेकजण ठार झाल्याची माहिती
Pakistan Airstrike News:पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानने बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) पुन्हा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केल्याचे वृत्त आहे, ज्यात अनेक तालिबानी दहशतवादी ठार झाले असून अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या एअर स्ट्राईकमुळे दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण बनले आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नुसार, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने या हल्ल्याबाबत निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, अफगाण तालिबानने बुधवारी पहाटे स्पिन बोल्दाक प्रदेशातील चार ठिकाणी भ्याड हल्ले केले. पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात १५ ते २० अफगाण तालिबानी मारले गेले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. फितना-अल-खवारीज आणि अफगाण तालिबानच्या लपण्याच्या ठिकाणी आणखी काही जमाव जमल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अफगाण तालिबान, फितना-अल-खवारीज आणि फितना-अल-हिंदुस्तान यांच्या चिथावणीखोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच कुर्रम सेक्टरमध्ये अफगाण तालिबानचा हल्ला उधळून लावल्याबद्दल शाहबाज शरीफ यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. अफगाण तालिबानच्या भ्याड हल्ल्याला पाकिस्तानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय अखंडतेचे कोणत्याही किंमतीत रक्षण केले जाईल, असाही त्यांनी इशारा दिला.