नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:19 IST2025-10-05T11:07:10+5:302025-10-05T11:19:01+5:30
‘ऑपरेशन सिंदूर १’ काळात भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही असं भारतीय लष्कर प्रमुखांनी म्हटलं होते.

नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
कराची - जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असे खडे बोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले होते. त्यावर आता पाकिस्तानी सैन्यानं उत्तर दिले आहे. जर भविष्यात या दोन्ही देशात युद्ध झाले तर ते खूप विनाशकारी असेल. पाकिस्तानी सैन्य शत्रूच्या प्रत्येक भागात लढण्यास सक्षम आहे अशी पोकळ धमकी पाकिस्तानी सैन्याने दिली आहे.
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, भारतीय संरक्षण मंत्री आणि सैन्य प्रमुखांकडून चिथावणीखोर विधाने पाहता भविष्यात कुठलाही संघर्ष झाला तर तो खूप विनाशकारी असू शकतो हा आमचा इशारा समजा. जर शत्रूत्वाचा नवा काळ सुरू झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही विना कुठलीही पर्वा न करता जोरदार प्रत्युत्तर देऊ. नवीन नियम बनवण्याचा विचार करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की पाकिस्तानने आता एक नवीन पद्धत स्वीकारली आहे, ही पद्धत जलद, निर्णायक आणि विनाशकारी असेल असं त्यांनी सांगितले.
तसेच अनावश्यक धमक्या आणि कुठल्याही हल्ल्यांना तोंड देताना पाकिस्तानचे लोक आणि सशस्त्र दल प्रत्येक शत्रूच्या प्रदेशात लढण्याची क्षमता आणि दृढनिश्चय बाळगतात. यावेळी आम्ही भौगोलिक सीमांमागे लपून राहण्याची कल्पना मोडून काढू आणि भारतीय भूभागाच्या सर्वात दुर्गम कोपऱ्यात पोहोचू. नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकण्याबाबत बोलाल तर, जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचे दोन्ही बाजूंना परिणाम होतील हे भारताने जाणून घेतले पाहिजे असंही पाकिस्तानी सैन्याने म्हटलं आहे.
भारतीय लष्करप्रमुख काय म्हणाले होते?
‘ऑपरेशन सिंदूर १’ काळात भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या. सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत.जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला खडसावले होते.