पाकिस्तानी लष्कराची दोन मालवाहू विमाने चीनमध्ये उतरली; मोठा शस्त्रसाठा आणण्याची तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 22:55 IST2026-01-26T22:54:39+5:302026-01-26T22:55:02+5:30
Pakistan Air Force IL-78 in China: पाकिस्तानच्या ताफ्यातील इंधन भरण्यासाठी वापरली जाणारी ही अवाढव्य विमाने चीनमधील लष्करी विमानतळावर उतरली आहेत.

पाकिस्तानी लष्कराची दोन मालवाहू विमाने चीनमध्ये उतरली; मोठा शस्त्रसाठा आणण्याची तयारी?
अमेरिकेच्या इराणवरील संभाव्य हल्ल्याच्या धास्तीत आणि ग्रीनलँड बळकावण्याच्या राजकारणात जग व्यस्त असताना, दुसरीकडे पाकिस्तान हवाई दलाच्या हालचालींनी संरक्षण तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानची दोन IL-78 एरियल रिफ्युलिंग आणि ट्रान्सपोर्ट विमाने अचानक चीनमध्ये दाखल झाली आहेत. ही विमाने संरक्षण साहित्य आणण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या ताफ्यातील इंधन भरण्यासाठी वापरली जाणारी ही अवाढव्य विमाने चीनमधील लष्करी विमानतळावर उतरली आहेत. सामान्यतः या विमानांचा वापर मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी किंवा लढाऊ विमानांना हवेत इंधन पुरवण्यासाठी केला जातो. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान चीनकडून काही महत्त्वाचे सुटे भाग किंवा नवीन क्षेपणास्त्र प्रणाली घेत असल्याची चर्चा आहे.
काय असू शकतो शस्त्रसाठा?
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान सध्या त्यांच्या JF-17 लढाऊ विमानांसाठी चिनी इंजिन किंवा एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांची मागणी करत आहे. तसेच, पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला अधिक मजबूत करण्यासाठी चीन काही अत्याधुनिक रडार यंत्रणा पुरवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतासाठी चिंतेची बाब?
चीन आणि पाकिस्तानमधील ही वाढती 'लष्करी जवळीक' भारतासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. विशेषतः प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या हालचाली होणे हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा या विमानांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.