महान भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशमधील घर पाडण्यात आले आहे. सत्यजित रे यांचे घर बांग्लादेशातील मयमनसिंग शहरात होते. ते पूर्वी मयमनसिंग शिशु अकादमी म्हणून ओळखले जायचे. भारत सरकारला ही इमारत जतन करायची होती. यासाठी बांग्लादेश सरकारकडे इमारतीची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याची ऑफरही दिली होती. मात्र, तेथील सरकारने या घरावर बुलडोझर फिरवला.
प्रसिद्ध साहित्यिक उपेंद्र किशोर रे चौधरी हे प्रसिद्ध कवी सुकुमार रे यांचे वडील आणि चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होते, जे या घरात राहायचे. या इमारतीकडे बऱ्याच वर्षांपासून लक्ष दिले जात नव्हते, त्यामुळे जीर्ण झाली होती. या १०० वर्षे जुन्या घराच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीत मदत करण्याची भारताने ऑफर दिली होती. मात्र, आता ही इमारत पाडण्यात आली आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने खेद व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केले दुःख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ही इमारत वाचवण्यासाठी पोस्ट केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आता ही इमारत पाडल्याप्रकरणी दुःख व्यक्त केले. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, बांग्लादेशी अधिकारी ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे वडिलोपार्जित घर पाडत आहेत, हे जाणून मला खूप दुःख झाले. ही १०० वर्षे जुनी मालमत्ता रे यांचे आजोबा उपेंद्रकिशोर रे चौधरी यांची होती, जे बंगाली साहित्य आणि संस्कृतीचे एक महान व्यक्तिमत्व होते. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हे एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते. इमारत पाडणे म्हणझे, रे कुटुंबाचे योगदान पुसून टाकण्यासारखे आहे.
बंगाली वारशावर आणखी एक धक्काभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी X या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्ट केले. ते म्हणाले, बंगाली वारशावर आणखी एक धक्का. बांग्लादेशात सत्यजित रे यांचे वडिलोपार्जित घर पाडण्यात आले. हे केवळ एका जुन्या रचनेचा नाश नाही, तर इतिहासाचे पुसून टाकणे आहे. जगातील एका महान चित्रपट निर्मात्याला उभं करणारी माती आता ढिगाऱ्यात बदलली आहे.
इमारत का पाडली?बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, मैमनसिंगमध्ये असलेली एक शतक जुनी रचना पाडून नवीन इमारत बांधली जात आहे. या ठिकाणी बाल अकादमी चालवली जाते, परंतु गेल्या १० वर्षांपासून इमारतीच्या खराब स्थितीमुळे येथून अकादमी चालवली जात नव्हती.