'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:53 IST2025-11-19T17:52:39+5:302025-11-19T17:53:13+5:30
या संघर्षादरम्यान, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानला जो धडा शिकवला, त्याच्या खुणा आजही ताज्या आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षादरम्यान, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानला जो धडा शिकवला, तिची खूण आजही ताजी आहे. भारताने हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले होते. आता सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी इस्लामाबादला अजूनही या नुकसानीची भरपाई करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
नूर खान एअरबेसवर दुरुस्तीचे काम सुरूच
ओपन सोर्स इंटेलिजेनस तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी १६ नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले की, "असे दिसते की पाकिस्तान नूर खान एअरबेसवर एका नवीन सुविधेचे बांधकाम करत आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या संघर्षादरम्यान भारताने याच ठिकाणाला लक्ष्य केले होते." 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा अहवाल देणारे डेमियन सायमन हे पहिले व्यक्ती होते.
सायमन यांचा मोठा दावा
याव्यतिरिक्त, उत्तर सिंधमधील जैकोबाबाद एअरबेसवर भारतीय हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या हँगरची देखील दुरुस्ती सुरू आहे. सायमन यांनी दावा केला की, संपूर्ण पुनर्बांधणी सुरू करण्यापूर्वी नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी हे काम केले गेले असावे. डेमियन सायमन यांनी १५ नोव्हेंबरला एक्सवर पोस्ट केले होते की, "मागील काही महिन्यांच्या फोटोंवरून दिसून येते की, मे २०२५च्या संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या जैकोबाबाद एअरबेसवर भारताने लक्ष्य केलेल्या हँगरचे छत टप्प्याटप्प्याने तोडण्यात आले आहे. दुरुस्तीपूर्वी तपासणीसाठी हे केले असावे."
पाकिस्तानला झाले मोठे नुकसान
रावलपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि उत्तर सिंधमधील जैकोबाबाद एअरबेससह, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुरीद, रफीकी, मुशफ, भोलारी, कादरिम, सियालकोट आणि सुक्कुर येथील पाकिस्तानी वायुसेनेच्या तळांसह १० पाकिस्तानी लष्करी ठिकाणे लक्ष्य केली होती. पाकिस्तानने भारतीय लष्करी तळ आणि नागरी भागांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने हे प्रतिउत्तर दिले होते.
'नूर खान एअरबेस'चे महत्त्व काय?
नूर खान एअरबेस पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडीजवळ स्थित आहे. हा केवळ एक प्रमुख लष्करी एअरबेस नाही, तर धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर हल्ला करणे म्हणजे पाकिस्तानच्या सुरक्षा कवचाला उद्ध्वस्त करण्यासारखे होते. नूर खान एअरबेसवरूनच पाकिस्तानची वायुसेना आपल्या फायटर जेट्समध्ये इंधन भरते. विमानांची दुरुस्ती देखील याच ठिकाणी होते. येथूनच पाकिस्तानचे व्हीव्हीआयपी नेते परदेश दौऱ्यासाठी विमानाने रवाना होतात.
या एअरबेसवरून पाकिस्तानची वायुसेना गुप्त लष्करी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट आणि एअरबोर्न रडार सिस्टीम चालवते. भारताने याच एअरबेसवर इतका भयंकर हल्ला केला होता की पाकिस्तान हादरला होता.