'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:09 IST2025-12-17T11:09:15+5:302025-12-17T11:09:50+5:30
"सर्व देशांनी या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची वेळ आली आहे. तसेच, ज्यू समुदायाला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, अशा हिंसक विचारधारेला जगात स्थान नसल्याचेही, ट्रम्प यांनी म्हटले आहे.

'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ज्यू समुदायावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे संपूर्ण जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टरपंथी इस्लामिकदहशतवादाविरोधात जगातील सर्व देशांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ज्यू समुदायाला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये आयोजित ज्यू समुदायाच्या 'हनुक्का' कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
सिडनी येथील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर रविवारी सायंकाळच्या सुमारास, ज्यू समुदायाचा हनुक्का उत्सव साजरा होत असतानाच दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. महत्वाचे म्हणजे, हे दोन जण बाप-लेक होते. या भीषण हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, हा इसिस प्रेरित हल्ला होता, असे ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मी आपल्या संपूर्ण देशाला, ऑस्ट्रेलियाच्या लोकांना आणि या भयानक यहूदी-विरोधी दहशतवादी हल्ल्याने प्रभावित झालेल्या सर्वांनाच प्रेम आणि प्रार्थना पाठवण्यासाठी थोडा वेळ काढू इच्छितो. आम्ही सर्व पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच, जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहोत. काही लोक गंभीर जखमी झाले आहेत."
याच बरबोर, "सर्व देशांनी या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची वेळ आली आहे. तसेच, ज्यू समुदायाला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, अशा हिंसक विचारधारेला जगात स्थान नसल्याचेही, ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी म्हटले आहे की, ज्यू समुदायात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर बाप-लेक साजिद अकरम, (वय ५०) आणि नवीद अकरम (वय २४), हे दोघेही इस्लामिक स्टेटच्या विचारधारेने प्रेरित होते. पोलिसांनी जप्त केलेल्या त्यांच्या गाडीत 'इसिस'चा झेंडाही आढळला आहे. या कारवाईत साजिद अकरमचा मृत्यू झाला असून, त्याच्या जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.