वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:01 IST2025-11-28T08:57:23+5:302025-11-28T09:01:19+5:30
Sarah Backstrom Death: वॉशिंग्टन डीसीजवळ व्हाईट हाऊस परिसरात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय सारा बेकस्ट्रॉम हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीजवळ व्हाईट हाऊस परिसरात बुधवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय सारा बेकस्ट्रॉम हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, २४ वर्षीय अँड्र्यू वोल्फ यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः बेकस्ट्रॉमच्या मृत्युची माहिती दिली आणि या घटनेवर शोक व्यक्त केला.
सारा बेकस्ट्रॉम आणि अँड्र्यू वोल्फ दोघेही ऑगस्टच्या सुरुवातीला वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्ड टीमसह वॉशिंग्टनमध्ये संघीय सुरक्षा मोहिमेचा भाग म्हणून आले होते. जून २०२३ मध्ये सारा बेकस्ट्रॉम मिलिटरी भरती झाली होती. तर, अँड्र्यू वोल्फ हा २०१९ मध्ये एअर नॅशनल गार्डमध्ये सामील झाला होता आणि त्याला अनेक सेवा पदके मिळाली आहेत.
संशयिताचे 'सीआयए' कनेक्शन
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी २९ वर्षीय रहमानउल्लाह लकनवाल नावाच्या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक केली. तो वॉशिंग्टन राज्यात राहत होता आणि त्याने पूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन एजन्सींसाठी काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लकनवालने बुधवारी दुपारी नॅशनल गार्डच्या सदस्यांवर हल्ला केला. त्याच्याविरोधात जीवे मारण्याच्या उद्देश, शस्त्र बाळगणे आणि हल्ला करणे अशा तीन आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रम्प यांची प्रतिक्रिया
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या घटनेला दहशतवादी कृत्य म्हटले आहे. तसेच, त्यांनी बायडेन प्रशासनाच्या काळात अफगाणिस्तानातून आलेल्या प्रत्येकाची पुन्हा तपासणी केली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ऑगस्टमध्ये वॉशिंग्टनमध्ये मोठ्या संख्येने नॅशनल गार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले. या हल्ल्यानंतर, संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी ट्रम्प यांच्या विनंतीवरून अतिरिक्त ५०० गार्ड कर्मचाऱ्यांची तैनाती करण्याची घोषणा केली.