चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:34 IST2025-07-07T16:34:00+5:302025-07-07T16:34:45+5:30
या दुर्दैवी घटनेत चमत्कारिकरित्या तीन महिन्यांची चिमुकली वाचली.

चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
'देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती पाकिस्तानातील एका घटनेतून येते. कराचीमध्ये पाच मजली इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी २० जण एकाच हिंदू कुटुंबातील होते. ही दुर्घटना इतकी मोठी होती की, सुमारे ५३ तास बचावकार्य चालले. विशेष म्हणजे, या घटनेत तीन महिन्यांची चिमुकली चमत्कारिकरित्या वाचली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाच मजली इमारत कशी पडली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बचावकार्यात २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यापैकी २० जण एकाच कुटुंबातील होते. या अपघातानंतर, एवढा मोठा अपघात का झाला आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, असे प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप यामागील कारणाबद्दल काहीही सांगितलेले नाही. सिंध सरकारचा दावा आहे की, लियारीमधील सुमारे २२ जीर्ण इमारतींपैकी १४ इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. ही कोसळलेली इमारत जीर्ण असल्याचेही म्हटले जाते.
तीन महिन्यांच्या मुलीचे प्राण कसे वाचले?
२७ जणांचा जीव घेणाऱ्या अपघातातून तीन महिन्यांची मुलगी चमत्कारिकरित्या वाचली आहे. बचाव कर्मचारी मजहर अली यांनी बीबीसीला सांगितले की, जेव्हा ते आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ढिगाऱ्याखालून एकएक करत मृतदेह बाहेर काढत होते. यावेळी त्यांना लहान मुलाचा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ ढिगारा बाजुला काढला असता, त्यात तीन महिन्यांची मुलगी जिवंत आढळली. तर, तिच्या आईसह कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला.